S-400 क्षेपणास्त्रे काय आहेत? भारताला त्यांचा नक्की काय आणि कसा फायदा होईल?

S-400 क्षेपणास्त्रे काय आहेत? भारताला त्यांचा नक्की काय आणि कसा फायदा होईल?

नुकतीच तुम्ही रशियाच्या S-400 क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी भारतात दाखल झाली आहे ही बातमी वाचली असेल. भारतात सुरक्षेसाठी अनेक आधुनिक शस्त्रास्त्रे दाखल केली जातात तसेच S-400 चेही आगमन झाले आहे. पण S-400 हे आहे काय? त्याची क्षमता किती आहे आणि यामुळे भारताची ताकद कशी वाढणार आहे याची माहिती आज आपण करून घेऊयात.

कुठल्याही प्रकारचे हल्ले थांबवण्यासाठी S-400 हे अत्यंत प्रभावी ठरणार आहे. S-400 हे Air Defence Missile System आहे. याची गणना जगातील सर्वात आधुनिक शस्त्रांमध्ये केली जाते. हे क्षेपणास्त्र शत्रूची लढाऊ विमाने, ड्रोन, मिसाईल आणि लपलेल्या विमानांवर मारा करण्यास सक्षम आहे आणि विशेष म्हणजे हे क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत अचूक मारा करू शकते. यामुळे भारताची हल्ला करण्याची क्षमता अजून मजबूत होईल. S-400 मध्ये सुपरसॉनिक आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आहेत. ज्यामुळे लक्ष्यांवर मारा करण्यास अजून सोपे जाईल.

अजून एक विशेष म्हणजे याच्या मदतीने शत्रूच्या लपलेल्या विमानांवरही मारा करता येईल. S-400 चे प्रक्षेपक अवघ्या ३ सेकंदात २ क्षेपणास्त्रे डागू शकते. यातून सोडलेली क्षेपणास्त्रे ५ किलोमीटर प्रति सेकंदाच्या वेगाने निघतात आणि ३५ किलोमीटर उंचीपर्यंत मारा करू शकतात. ही प्रणाली रशियाच्या S-300 ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. रशियामध्ये अल्माझ-आंते यांनी ही विकसित केली आहे. २००७ पासून ती रशियामध्ये कार्यरत आहे.

भारताने ऑक्टोबर २०१९ मध्ये रशियासोबत S-400 क्षेपणास्त्र प्रणालीसाठी करार केला होता. या करारात सुमारे ४० हजार कोटी रुपये खर्चाच्या पाच S-400 रेजिमेंट खरेदी केल्या जातील. त्यातील पहिली खेप भारतात आली आहे.

हे क्षेपणास्त्र आता पंजाब सेक्टरमध्ये तैनात करण्यात आले आहे. तेथून चीन आणि पाकिस्तानकडून होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल. तिथल्या कुरघोडीना प्रत्युत्तर देता येईल. बाकीच्या चार रेजिमेंटही भारतात लवकर दाखल होतील त्यामुळे भारताची ताकद खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

भारतीय सैन्य डोळ्यात तेल घालून सीमांवर लक्ष ठेवून असतात. आता त्यांच्या मदतीला S-400 सारखे क्षेपणास्त्र आल्याने सुरक्षा अजूनच वाढणार आहे.

शीतल दरंदळे