भारतात जेव्हा काही विशिष्ट परिस्थितीतून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने देशवासीयांसाठी काही उपाय शोधण्याची आवश्यकता निर्माण होते, तेव्हा या मातीतले बुद्धिमान लोक त्या विशिष्ट परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या साधनांचा शोध लावतात. आजची गोष्ट ही अशीच आहे- पवित्रपती मास्कची!!
जानेवारी २०२० मध्ये भारतात पहिला कोविड-१९ चा रुग्ण सापडला. तोवर जगभरातून त्याच्या महामारीची चर्चा सुरू झाली. महिन्याभरात भारतातल्या रुग्णांची वाढती संख्या बघता सरकारने आवश्यक त्या उपाययोजना करायला सुरूवात केली. याचाच एक भाग म्हणून केन्द्र सरकारने 'कोविड कवच' प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पांतर्गत कोविड-१९ विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्याबाबत भारतभरातून सूचना मागवण्यात आल्या. या विषयीची बातमी कोल्हापुरातल्या शिवानंद पाटीलने ऐकली तेव्हा त्याने आपल्या अभ्यासाच्या आधारे केन्द्र सरकारकडे काही सूचना पाठवण्याचं ठरवलं.
शिवानंदने मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी म्हणजे पूर्वीच्या युडीसिटीमधून M.Sc Tech केलं आहे. तोपर्यंत त्याच्या वडिलांनी सुरू केलेला कापडांसाठीचे रंग बनवण्याचा व्यवसाय तो सांभाळत होता. त्याचा धाकटा भाऊ विवेकानंद पाटील टेक्स्टाईल टेक्नोलॉजीस्ट आहे. गेली वीस वर्षे कापडांसंबंधी व्यवसाय फार जवळून पाहिला असल्याने शिवानंद आणि विवेकानंद दोघांनाही याबद्दलच्या तंत्रज्ञानाची माहिती होती. कापडावरील रंगांच्या व्यवसायामुळे त्यांना जगभरातील नैसर्गिक आणि कृत्रिम कापड निर्मिती आणि त्यांच्या वापराबद्दलचं ज्ञान होतं. शिवानंदनं त्याचं स्वतःचं केमिकल टेक्नोलॉजीचं ज्ञान आणि विवेकानंदच्या टेक्स्टाईल टेक्नोलॉजीचं ज्ञान यांची सांगड घालून भारतीय केन्द्र सरकारला कोविड कवचद्वारे नैसर्गिक कापडापासून बनू शकणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यासाठी उपयुक्त संरक्षक पेहरावाच्या प्रकल्पाचा प्रस्ताव पाठवला.







