हत्तींचा हा कळप चीनच्या युनान प्रांतातील अभयारण्यातला आहे. मार्च २०२० साली या हत्तींनी आपला प्रवास सुरु केला होता. डिसेंबरमध्ये त्यांनी अभयारण्य ओलांडून पळ काढला. तेव्हा देखील या विषयाची चांगलीच चर्चा रंगली होती. आज १५ महिने होऊन आणि तब्बल ५०० किलोमीटर चालून झाल्यावर या हत्तींना नेमके जायचे कुठे आहे याबद्दल मात्र संभ्रम आहे.
प्रवीण कासवान नावाच्या एका आयएफएस अधिकाऱ्याने या हत्तींचा फोटो शेयर केला आणि तो लगेच व्हायरल झाला. त्यांनी लिहिले होते की सहसा हत्ती उभे असतानाच झोपतात. पण हत्तींना या पद्धतीने झोपलेला बघणे रंजक आहे.
हत्ती दौऱ्यावर निघाले म्हणजे ते शांतपणे चालत आहेत असेही नाही. या हत्तींच्या कळपाने आजवर तब्बल ७ कोटींपेक्षा जास्त गोष्टींचे नुकसान केले आहे. या कळपात एकूण १६ हत्ती होते. त्यातले २ परत गेले तर एका हत्तीणीने पिल्ल्याला जन्म दिला आहे. सध्या या कळपात ६ मादी, ३ नर, ३ किशोरावस्थेतील तर ३ लहान हत्ती आहेत.
चीनमधील महत्वाच्या संस्थांचे मात्र या कळपावर बारीक लक्ष आहे. आराम करून झाल्यावर हे हत्ती जेव्हा पुन्हा चालायला लागले तेव्हा त्यांचा रस्ता मोकळा करण्यासाठी तब्बल ४१० कर्मचारी, ३७४ वाहने वापरण्यात आले. याखेरीज १४ ड्रोन्सच्या सहाय्याने त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे. तसेच या हत्तींना जेवण्यासाठी २ टन अन्नाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यांना निश्चित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी बाकी रस्ते बंद करण्यात आले आहेत. जेणेकरून ते बरोबर ठिकाणी पोहोचतील.