कोविड -१९ च्या काळात ऑनलईन खरेदी खूप वाढली. डिजिटल पेमेंट करणे सोयीचे आणि सोपे असल्याने ग्राहक आर्थिक व्यवहारांसाठी ऑनलाइन पेमेंट करतात. सुट्या पैशांची कटकट नाही, अगदी दहा रुपयांपासून लाखो रुपयांचे पेमेंट करून घरबसल्या खरेदी करता येते. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, अकाउंट ट्रान्सफर, UPI अशा अनेक पद्धतीने पेमेंट करता येते. आजकाल स्मार्टफोन आणि इंटरनेट सगळ्यांकडे असल्याने हे व्यवहारही वाढले. पण जसे फायदे असतात तसेच या पद्धतीत धोकेही वाढले. ऑनलाइन व्यवहार करताना होणारी फसवणूक वाढू लागली आणि त्यामुळे तक्रारीही वाढू लागल्या. आज आपण पाहूयात ई-कॉमर्स फसवणूका कशा पद्धतीने केल्या जातात.
ऑनलाईन खरेदी-विक्री दरम्यानच्या फसवणूका आणि त्या टाळण्याचे हे मार्गही माहित असायलाच हवेत!


खाते टेकओव्हर फसवणूक Account Takeover Fraud
अकाउंट टेकओव्हर फसवणूक ही सर्वात गंभीर प्रकारची फसवणूक आहे. यामध्ये ग्राहकांची ओळख काढून ही चोरी केली जाते. म्हणजे या प्रकारात फसवणूक करणारे वैयक्तिक माहिती मिळवून खात्यावर लॉगिन करतात. हे चोर पासवर्ड, चोरीचे सुरक्षा कोड (security code) किंवा फिशिंग/खोट्या योजना वापरून खात्यामध्ये प्रवेश मिळवतात. आणि ग्राहकांची वैयक्तिक माहिती टाकून ई-कॉमर्स वेबसाइटवर कायदेशीर प्रवेश मिळवतात.
एकदा प्रवेश मिळवल्यावर ते खात्याची माहिती बदलू शकतात, खरेदी करू शकतात आणि त्यांनी ज्या वेबसाइटवर प्रवेश मिळवला आहे तिथे पैसे असल्यास तेही सहज काढू शकतात. थोडक्यात तुमचे अकाउंट हॅक होते.

कार्ड फसवणूक Card Testing Fraud
कार्ड फसवणूक म्हणजे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड चोरायचे आणि ती माहिती वापरून चोरी करायची. ही चोरीची पद्धत माहिती वापरून खरेदी करण्यासाठी वापरली जाणारी आणखी एक सामान्य पद्धत आहे. सहसा यामध्ये मोठी खरेदी करण्याआधी एक लहानसा व्यवहार केला जातो आणि त्या कार्डची चाचणी केली जाते. तो यशस्वी झाल्यास मोठी खरेदी केली जाते. कार्डचे पूर्ण लिमिट वापरले जाते. हे सर्व काही तासांत होते. चोरलेल्या कार्डवरून खरेदी केल्यास इ-कॉमर्स वेबसाईटला काही कळत नाही. त्यांना वाटते खरे ग्राहकच खरेदी करत आहेत.

चार्जबॅक फसवणूक Chargeback Fraud
चार्जबॅक फसवणूक कधीकधी 'फ्रेंडली फसवणूक' मानली जाते. इथे ग्राहक नाही, तर इ-कॉमर्स कंपनीची फसवणूक केली जाते. ग्राहक ऑनलाइन खरेदी केलेला माल/उत्पादने घेऊन ठेवतो आणि तरीही रिफंड मागतो. ग्राहक त्यांनी सदर वस्तू खरेदी न करताच त्यांच्या क्रेडिट कार्डावरचे पैसे गेल्याचा दावा करु शकतात. कधी ते ग्राहक कंपनीच्या धोरणाचा गैरवापर करून ती उत्पादने विनामूल्य ठेऊन घेण्याचा प्रयत्न करतात. अर्थात यात ट्रॅक केलेले शिपिंग, रिटर्न पॉलिसी, कार्डने केलेला व्यवहार या गोष्टींमुळे ही फसवणूक टळू शकते.

परतावा फसवणूक Refund Fraud
परतावा फसवणूक म्हणजे जेव्हा चोरलेले क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केली जाते आणि नंतर पर्यायी क्रेडिट देऊन त्या कार्डवर परतावा मागितला जातो. फसवणूक करणारे अनेकदा ई-कॉमर्स व्यापाऱ्याला असे परतावा देण्यासाठी फसवू शकतात. ते सांगतात की जुने क्रेडिट कार्ड खाते आता बंद झाले आहे आणि म्हणून परतावा नवीन कार्डावर द्या. ही बरीच सोपी आणि प्रभावी युक्ती आहे आणि ती किरकोळ विक्रेत्याला ओळखणे कठीण जाते.

या सर्व फसवणुकीच्या पद्धती पाहिल्यावर एक लक्षात येते की कार्डची कुठलीही माहिती सांभाळून ठेवणे किती गरजेचे आहे. ओळखीचा आहे म्हणून पिन नंबर किंवा पासवर्ड सांगणे धोकादायक ठरू शकते. भारतात खूप मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फसवणुकीचा धोका वाढत आहे. पण एक चांगले आहे की आपल्याकडे नियम बरेच कडक आहेत. सरकारी आदेशानुसार फसवणूकविरोधी विविध प्रोटोकॉल अस्तित्वात आहेत. सायबर सेल पूर्ण सक्षमतेने या गुन्ह्यांचा शोध घेऊ शकते. बँकाही दरमहा ग्राहक हितासाठी नवनवे नियम बदल करतात.

२०२० मध्ये १.१६ दशलक्ष सायबर गुन्ह्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. २०१९पेक्षा ही वाढ तिपटीने जास्त झाली आहे. यात वरील दिलेल्या पद्धती पैकी एक पद्धत वापरून फसवणूक केली गेली आहे.सरकार आता लवकरच नवीन आणि अद्ययावत 'इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाद्वारे सायबर सुरक्षावरील राष्ट्रीय धोरण' (National Policy on Cybersecurity by the Department of Electronics and Information Technology) यावर काम करत आहे. त्यामुळे सुरक्षा वाढण्यास अजून मदतच होणार आहे.ग्राहकांच्या सुरक्षितता महत्वाची आहेच पण जे व्यापारी ऑनलाइन व्यवसाय करून या फसवणुकीला बळी पडतात त्यांच्यासाठी अनेक महत्वाचे निकष आहेत. त्यांनी नियमित आपली वेबसाइटचे सुरक्षा ऑडिट करावे, सर्व प्रमाणपत्रे, सॉफ्टवेअर आणि प्लगइन अद्ययावत करून घ्यावे. ग्राहकांनाही इ कॉमर्स वेबसाईटचे अँप डाउनलोड करताना काळजी घ्यावी.
शीतल दरंदळे