शहरी जीवन म्हणजे नुसती धावपळ आणि दगदग! अनेकांना शहर सोडून गावात राहायला जाण्याची इच्छा असते पण शहरातील रोजीरोटीसोडून गावात जाऊन करणार काय, मुले मोठी झाली, त्यांची लग्न झाली की मग बघू असा विचार करून आहे तेच आयुष्य ढकलत राहतात. पण, जर खरंच निसर्गाच्या कुशीत आणि निसर्गानुकुल राहण्याची तीव्र इच्छा असेल तर, आजच्या युगातही गावात राहणे खूप सोपे आहे, हे बेंगळूरूच्या एका उच्चशिक्षित जोडप्याने सिद्ध करून दाखवले आहे.
तामिळनाडूच्या नौशाद्या आणि सुधाकर यांच्या बदलाची ही कथा कदाचित तुमच्या मनातील आयुष्य जगण्याची प्रेरणा देऊन जाईल. सुधाकरचे बालपण मुंबईत गेले तर नौशाद्याचे चेन्नई-बेंगळूरू सारख्या महानगरात. बालपणापासून महानगरात जीवन काढलेल्या दोघांनीही फक्त काही तरी बदल म्हणून गावात जाऊन राहण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्याच्या या निर्णयामागेही एक इतिहास आहे. अगदी विचारविमर्श करूनच दोघांनीही साधीसरळ ग्रामीण जीवनशैली अंगिकारली आहे.






