गिर्यारोहक म्हणून वैभव पांडुरंग ऐवळे याची ओळख त्याच्या लेखातून बोभाटाच्या वाचकांना आहेच.भारताच्या ७२ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो सर करून ७२ भारतीय ध्वजांचे ध्वज-तोरण फडकावून विश्व-विक्रम स्थापित केला.पण आज आम्ही वैभवने नुकत्याच पार पडलेल्या आषाढी वारीत काही नवा उपक्रम केला त्याची माहिती देत आहोत. वैभव सोलापूर जिल्ह्यातल्या संगोली येथील वाढेगावातला,म्हणजे पंढरपूर जवळच्याच गावातला त्यामुळे बऱ्याच वेळा चंद्रभागेत डुबकी मारून माऊलीचे दर्शन घेतले आहे. पण,वारीला जाण्याचा योग कधी आला नाही. वारी करावी असे नेहमी वाटत होते. यावर्षी एका सामाजिक संकल्पनेचा पाठपुरावा करण्यासाठी त्याने वारीत सहभाग घेतला. काय होती ती संकल्पना ? त्याच्याच शब्दात वाचूया !
अवयवदानाचे महत्व सर्वसामान्य लोकांना कळावे याकरीता आम्ही यंदाची वारी केली. वारीमध्ये चालत असताना दिंडीतील सर्व वारकऱ्यांना आम्ही अवयव दानाचे महत्व पटवून दिले आणि त्यांना अवयवदान कसे करावे याची सविस्तर माहिती दिली. मृत्यूनंतर कुणाचे तरी जीवन फुलवूया! असा जर विचार मनात आणला तर समाजातील हजारो नागरिक या अवयवदान अभियानात स्वत:हून सहभागी होतील, अवयवदानाचा अर्ज भरतील. याचाच एक भाग म्हणून अवयवदानाचे महत्व पटवून देण्यासाठी आम्ही यंदा पंढरीची वारी केली.

