सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२२ -एका ऍड फिल्म मेकरला सायबर गुन्हेगारांकडून ९६ लाख रुपयांचा चुना.
मार्च २०२३ - निवृत्त अधिकार्याला १ कोटी रुपयांना ऑनलाईन ठकवले.
जून २०२३ - चक्क १४० आयटीवाल्यांना १६ करोड रुपयांचा चुना.
जून २०२३ - मल्टिनॅशनल कंपनीत काम करणार्या अधिकार्याला १.६४ कोटींना आणि
खाजगी कंपनीत कार्यरत असलेल्या एका स्त्रीला ८७.८४ लाखाला ऑनलाईन गंडा.
गेल्या काही दिवसात घडलेल्या ह्या घटना आहेत. हा फक्त पुण्या-मुंबईतला आकडा आहे.महाराष्ट्र आणि देशभराचे गणित इथे विचारातच घेतलेले नाही. यावरून तुम्हाला ह्या प्रचंड मोठ्या फसवणुकीचा अंदाज येईल. विशेष म्हणजे हे फसवले गेलेले सर्व लोक ’टास्क फ्रॉड’च्या आमिषाला बळी पडलेले आहेत. सुशिक्षित आणि नोकरदार लोकांचा देखील यामध्ये समावेश आहे हे विशेष. झटपट मार्गाने हवा असलेला पैसा, कधी नोकरीच्या जोडीने एखादा जोडधंदा असावा म्हणून तर कधी जॉब हवा, मग तो कोणताही असो अशा विचाराने असेल पण अनेक लोक ह्या टास्क फ्रॉडच्या सापळ्यात अडकत चालले आहेत. विशेषतः कोरोना काळामध्ये अनेकांच्या नोकर्या गेल्या,अनेकांची पैशाची निकड वाढली तेव्हापासून ही फसवणूक अधिक प्रमाणात वाढली आहे.




