अडोबीची स्थापना १९८२ मध्ये चार्ल्स गेश्के आणि जॉन वॉरनॉक यांनी केली. हे दोघं आधी झेरॉक्स कॉर्पोरेशन (आपण जी झेरॉक्स काढून आणतो, ती या कंपनीचीच देन) या कंपनीत ग्राफिक रीसर्चचं काम करत होते. पण त्यांनी विकसित केलेली उत्पादनं रीसर्च स्टेजच्या पुढे जायला तयार नव्हती. म्हणजे झेरॉक्स कंपनी तसं काही होऊ देत नव्हती. शेवटी निराश होऊन दोघांनी कंपनी सोडण्याचा आणि स्वतःचा नवीन उद्योग सुरू करण्याचा विचार केला आणि त्यांच्या घराजवळून वाहणाऱ्या एका खाडीच्या नावावरून अडोबी ही कंपनी जन्माला आली.
त्यानंतर यांनी पोस्ट स्क्रिप्ट नावाचं सॉफ्टवेअर विकसित केलं. मुळात ही एक संगणकीय भाषा होती. तिचा वापर करून कॉम्प्युटरवर साठवलेली कोणतीही इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्स जशीच्या तशी प्रिंट करता येत असत. या डॉक्युमेंटमधली कॅरेक्टर्स, त्यांच्यामधलं अंतर किंवा स्पेसिंग, त्या कॅरेक्टर्सची साईझ ही सर्व माहिती पोस्ट स्क्रिप्टच्या माध्यमातून प्रिंटरला पुरवली जात असे. डीटीपी म्हणजेच डेस्क टॉप पब्लिशिंग या तंत्राचा उदय होण्याचा हा काळ. यामुळे प्रिंटिंगमध्ये मोठी क्रांती झाली. प्रिंटिंगचं क्लिष्ट वाटणारं काम आता सोईस्कर बनलं.
पोस्ट स्क्रिप्टचे संभाव्य उपयोग आणि त्याला येऊ घातलेली मागणी लक्षात घेऊन अडोबीने संगणक, प्रिंटर, इमेज सेटर आणि फिल्म रेकॉर्डरच्या निर्मात्यांना पोस्ट स्क्रिप्टचं मार्केटिंग करण्याची परवानगी दिली. पुढे त्यात ऍपलने गुंतवणूक केली.
यापुढचं आव्हान म्हणजे पोस्ट स्क्रिप्ट कुठल्याही मशीनवर चालवता येईल अशा प्रकारे तिचा विकास करणं. यासाठी प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीम आणि हार्डवेअर कॉन्फिगरेशनसाठी चालतील अशी ५००० पेक्षा जास्त पोस्टस्क्रिप्ट ॲप्लिकेशन्स विकसित केली गेली. या लॅंग्वेजचा वापर करून चालवता येतील असे प्रिंटर्स तयार केले गेले. लवकरच पोस्टस्क्रिप्ट मिनी कॉम्प्युटर्स आणि मेनफ्रेम कॉम्प्युटर्सवर वापरता येऊ लागली. एकेक टप्पे पार करत काही दिवसांनी जगभरात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्युटर लँग्वेजेसमधे या भाषेचा समावेश होऊ लागला.
या पोस्ट स्क्रिप्ट लॅंग्वेज प्रणालीला पूरक असं अजून एक तंत्रज्ञान अडोबीने विकसित केलं. ते टाईप वन या नावाने ओळखलं जाऊ लागलं. याचा वापर करून कोणत्याही रेझोल्युशनमध्ये प्रिंट करता येतील अशा प्रकारचे डिजिटल फॉन्ट्स तयार करता आले. त्यानंतर त्यांनी टाईपफेसेस तयार करायला सुरुवात केली. (टाईपफेस हा फॉन्टचाच मोठा भाऊ. उदाहरणार्थ हेल्वेटीका हा झाला टाईपफेस. यात विविध फॉन्ट्सचा अंतर्भाव होतो, ज्यांचं वळण, स्टाईल, अक्षरांची जाडी हे सर्व हेल्वेटीका या विशिष्ट फॅमिलीसारखं आहे.) दरम्यान कंपनीची घोडदौड सुरू राहिली. ती आता पब्लिक कंपनी होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली होती.
अडोबीच्या यशामागे एक महत्त्वाचं सूत्र आहे, ते म्हणजे ॲपलसारख्या उत्पादन कंपन्यांना आपल्या तंत्रज्ञानाचा आणि मार्केटिंगचा परवाना देण्याचं कंपनीचं धोरण. यामुळे अडोबीला विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध झाली.