१७ रुपयाच्या शेअरची खरेदी १६१०२३ रुपयात कोण करते आहे ?

लिस्टिकल
१७ रुपयाच्या शेअरची खरेदी  १६१०२३ रुपयात  कोण करते आहे ?

शेअरबाजार म्हणजे सतत हलता बाजार! इथे कधी राजाचा रंक आणि रंकाचा राजा होईल हे सांगता येत नाही.शेअर बाजारात 'राजा' असलेले समभाग अनेक आहेत ज्यांची नावं आपल्या परिचयाची आहेत. उदाहरणार्थ रिलायन्स - स्टेट बँक- बजाज वगैरे वगैरे. हे समभाग 'राजा' म्हणण्याच्या लायकीचे असतील तर  'रंक' म्हणता येईल असे समभाग कोणते ? ज्याला बाजाराच्या परिभाषेत पेनी स्टॉक म्हणतात असे समभाग म्हणजे पेनी स्टॉक.दोन अडीच रुपयापासून पंधरा-वीस रुपयात हे समभाग मिळतात.कधीकधी अशा समभागांच्या ग्रहांचा फेरा बदलतो आणि  रातोरात  अशक्य वाटाव्या अशा किमतीत त्यांची खरेदी-विक्री सुरु होते.आजचा बोभाटाच लेख अशाच एका पेनी स्टॉकबद्दल आहे. या कंपनीचे नाव आहे एल्सीड इन्व्हेस्टमेंट.जेमतेम १७ रुपयाचा बाजारभाव असलेला हा समभाग कंपनीचेच संचालक १६१०२३  रुपयात खरेदी करायला तयार आहेत.

असं काय खास आहे या समभागात ?

असं काय खास आहे या समभागात ?

एल्सीड इन्व्हेस्टमेंट ही कंपनी 'होल्डींग कंपनी 'या वर्गवारीत मोडते.आता होल्डिंग कंपनी म्हणजे काय तेही समजून घेऊ या.होल्डिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड असू शकते.एखादया कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करून त्या कंपनीच्या कारभारावर अप्रत्यक्ष रित्या लक्ष ठेवणे,ताबा ठेवणे,हा होल्डिंग कंपनी स्थापन करण्याचा उद्देश असतो.उदाहरणार्थ Pilani investment & industry corp ltd ही बिर्ला समूहाची होल्डिंग कंपनी आहे.यापैकी बऱ्याच कंपन्या पब्लिक लिमिटेड असतात, त्यांचे समभाग शेअरबाजारात नोंदणी झालेले असतात.या होल्डिंग कंपन्यांचा फायदा तोटा ज्या कंपनीत त्यांची गुंतवणूक असते त्यांच्यावर अवलंबून असतो.साहजिकच लिस्टिंग असूनही होल्डिंग कंपन्यांच्या शेअरला बाजारात फारशी मागणी नसते. असे असले तरी  या शेअरची intrinsic value  म्हणजे आंतरिक मूल्य वाढत जाण्याची शक्यता असते.

बाजारभाव १७ रुपये -आंतरिक मूल्य ४३१००० !

बाजारभाव १७ रुपये -आंतरिक मूल्य ४३१००० !

आपण ज्या समभागाबद्दल आज बोलतोय त्यात नेमके हेच घडले आहे.वरवर बघता १७ रुपयाचा बाजारभाव दिसत असला तरी intrinsic value कोटीच्या घरात आहे.
तर सांगायचा मुद्दा हा की एल्सीड इन्व्हेस्टमेंट ही एक प्रकारची होल्डिंग कंपनी आहे. एशियन पेंट्स या सुप्रसिध्द कंपनीच्या २८३१३८६० समभागांची मालकी या कंपनीकडे आहे.आजच्या तारखेस एशियन पेंट्सच्या एका समभागाची किंमत रु.३०२२ आहे. म्हणजेच जवळजवळ ८२०० कोटी रुपयांचे समभाग या कंपनीकडे आहेत.एल्सीड इन्व्हेस्टमेंटचे एकूण समभाग २००००० आहेत. याचा अर्थ असा की प्रत्येक समभागाची intrinsic value (आंतरिक मूल्य) तब्बल ४३१००० आहे. आणि बाजारात भाव काय तर केवळ १७ रुपये !!!

आता आपण ३ ठळक विधानांचा विचार करू या.


१ या कंपनीच्या  समभागाचा बाजारभाव केवळ १७ रुपये आहे.- हा केवळ सांगायचा भाव आहे.या भावात कोणीही समभाग विकायला तयार नाही.गेल्या वर्षभरात केवळ एका समभागाची देवाणघेवाण झाली आहे.


२ प्रत्येक समभागाची intrinsic value (आंतरिक मूल्य) तब्बल ४३१००० आहे.या भावात कधीही खरेदी-विक्री होत नाही.


३ हा समभाग कंपनीचेच संचालक १६१०२३  रुपयात खरेदी करायला तयार आहेत. संचालकांकडे या कंपनीचे ७५% समभाग आहेत.गुंतवणूकदारांकडे २५% समभाग आहेत.हे सगळे समभाग खरेदी करून संचालकांना कंपनीची शेअरबाजारातील नोंदणी रद्द (delist) करायची आहे.

संचालक असे करू शकतात का ? 

संचालक असे करू शकतात का ? 

होय-अशा प्रकारची ऑफर संचालक देऊ शकतात आणि इतर शेअरहोल्डर ती नाकारू/स्विकारू शकतात.अशा ऑफरनंतर बर्‍याच वेळा संचालक आणि  इतर शेअरहोल्डर एखादी नवी सहमतीची किंमत ठरवतात आणि प्रकरण संपते.

पण इतर शेअरहोल्डर तयार झालेच नाहीत तर  अशा वेळी कंपनीचे संचालक हा प्रस्ताव कोर्टासमोर मांडतात.कोर्ट जो निर्णय देईल तो उभयपक्षी मान्य करावा लागतो अन्यथा प्रकरण वरच्या कोर्टात जाते.या खटल्यात बरीच वर्षे निघून जातात . बर्‍याच वेळा तेलही गेले तूपही गेले -हाती आले धुपाटणे अशी स्थिती होते. कॅडबरी इंडिया या कंपनीच्या समभागात असेच घडले होते. अल्पमतात असलेल्या समभागधारकांनी १० वर्षे कोर्टात खेटे घातल्यावर हा खटला संपुष्टात आला.
 कोडॅक- रे बॅन- ओटीस -पॅनासॉनीक अशा अनेक कंपन्या आतापर्यंत नोंदणी -रद्द (delist) झाल्या आहेत. 

 

वाचकांनी काय करायचे ?

वाचकांनी काय करायचे ?

 हा शेअरबाजार आहे. इथे अशा अनेक गमतीजमती घडत असतात.वाचकहो,तुम्ही धावाधाव करून हा शेअर शोधावा आणि घ्यावा असा आमचा सल्ला नाही.या अशा बातमीच्या निमित्ताने शेअरबाजारातील अनेक गुंतागुंतीच्या बाबी सहजरितीने समजावून घेता येतात. हा एक प्रकारचा पाठ्यपुस्तकातील धडा आहे. आता यानंतर बाजारातील इतर होल्डींग कंपन्यांचा तुम्ही अभ्यास कराल. त्यांचे मूल्य समजून घेण्याचे गणित मांडाल अशी अपेक्षा आहे.. हा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर सांगा .