आशिया खंडात आवडीने खाल्ला जाणारा भात तब्बल ९००० वर्षे जुना आहे? वाचा भाताच्या लागवडीची कहाणी!!

लिस्टिकल
आशिया खंडात आवडीने खाल्ला जाणारा भात तब्बल ९००० वर्षे जुना आहे? वाचा भाताच्या लागवडीची कहाणी!!

भात हा आपल्या देशातला एक प्रमुख अन्नपदार्थ आहे. तसा तर जगभरातल्या खाद्यसंस्कृतींत तांदळापासून बनवलेल्या पदार्थांना स्थान आहेच. पण भारतात भात हा दैनंदिन आहारात असतोच असतो. नित्याची देवपूजा उरकल्यानंतर नैवेद्य दाखवण्यापासून ते लग्नाच्या अक्षता आणि त्यानंतर जेवणाच्या पंगतीत भाताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काही लोकांना तर भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाले असे वाटतच नाही आणि काही लोकांसाठी फक्त भात आणि भाताचे विविध प्रकार हेच संपूर्ण जेवण असू शकते. भारतातच नाही तर संपूर्ण आशिया खंडात भात हा असा आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. मग या भातासाठी जो तांदूळ लागतो, तो कधीपासून पिकवला जात असेल? सर्वात आधी कुठे पिकवला गेला असेल? हे असे प्रश्न तुम्हांला कधी पडले आहेत का? आम्हांला तर पडले, आणि म्हणूनच या प्रश्नांची उत्तरे आम्ही खास बोभाटाच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत.

तुमच्या आमच्या रोजच्या आहारात नित्यनेमाने हजर असणारा आणि आपली रसना तृप्त करणारा तांदूळ गेली हजारो वर्षापासून आपल्या सेवेत आहे. भारतात गंगेच्या खोऱ्यात २००० वर्षांपूर्वी भातशेतीला सुरुवात झाली असे मानले जाते. त्याआधी चीनमध्ये सुमारे ९००० वर्षापासून तांदळाचे पिक घेतले जात होते. चीनच्या यांगत्झे नदीच्या खोऱ्यात शिकार करणाऱ्या मानवी टोळ्या आता आपली जीवन शैली बदलू पाहत होत्या. त्यांना जंगलात तांदळाच्या वनस्पती आढळल्या. या जंगली तांदळाची लागवड करुन तांदूळ शेतीला सुरुवात केली. व्यापाराच्या माध्यमातून चीनमधून तांदूळ हे धान्य भारतात आले. चीनमधून आलेला तांदूळ आणि भारतीय तांदूळ यांच्या संकरातून नव्या तांदळाच्या जाती निर्माण झाल्या. चीनच्या तुलनेत भारतात भातशेती उशीराच सुरू झाली म्हणा ना.

आजही तांदळाच्या उत्पादनात चीन हा आघाडीचा देश आहे. चीन, भारत, बांगलादेश आणि इंडोनेशिया या देशात भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यानंतर जपान, पाकिस्तान आणि आग्नेय आशियाचा क्रमांक लागतो. युरोप, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया इथेही काही प्रमाणात भातशेती केली जाते.

भात हा फक्त भारताचे प्रमुख अन्न आहे असे नाही, तर जगातील निम्मी लोकसंख्या भात खाऊनच जगते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जगाच्या तुलनेत आशियामध्ये तांदळाचा खप दुपटीने जास्त आहे हे मात्र नक्की. आशियामध्ये तांदळाला सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही अनन्यसाधारण महत्त्व आहे.

उष्ण आणि दमट हवामानात हे पिक चांगले येते. तांदळाच्या पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीत पाणथळ जमीन तयार केली जाते. या जमिनीत बियाणे पेरले जाते. २५ ते ५० दिवसांनी याची रोपे तयार झाल्यानंतर ती शेतात पेरली जातात. या रोपांनाही ५ ते १० सेमी उंचीच्या पाण्यात ठेवले जाते. रोपांची वाढ होताना त्यांना असे पाण्यात बुडवून ठेवणे आवश्यक असते.

भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या तांदळाच्या जाती प्रसिद्ध आहेत. महराष्ट्रातही जिरेसाळ, आजरा घनसाळ, आंबेमोहर, इंद्रायणी, कामोद, काळी साळी, कोलपी, कोलम, कोळंबा, खडक्या, गरा कोळंबा, गोदवेल, घुड्या, चिन्नोर, रत्नागिरी, राजावळ, पठारी, भोगावती, पांढरी साल, अशा कितीतरी तांदळाच्या जाती प्रसिद्ध आहेत. या शिवायही अनेक जातीचे तांदूळ संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रातही पिकवले जातात.

तांदूळ पचायला हलका आणि चवीलाही उत्तम असल्याने लहान बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्याच आहारात याचा समावेश असतो. पंचतारांकित हॉटेलपासून आदिवासी पाड्यापर्यंत तांदूळ आणि त्यापासून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात. तांदळापासून पेज, भात, कणी, भाकरी, इडली, डोसा, आप्पे, उकडी मोदक, आंबोळी, चिरमुरे असे कित्येक पदार्थ बनवले जातात. इतकेच काय पण, नेपाळ, तिबेट मध्ये तांदळाची बिअरसुद्धा बनवली जाते. थायलंडमध्ये यापासून व्हिस्की देखील बनवतात. म्हणूनच तांदळाला पूर्णान्न म्हटले जाते.

अनेक जण वजन वाढण्याच्या भीतीने भात खाण्यावर नियंत्रण ठेवतात, पण तांदळात अनेक पोषकद्रव्ये असतात. यात फायबर, ब जीवनसत्व, कर्बोहायड्रेट्स, लोह, जस्त अशी महत्वाची खनिजद्रव्येही तांदळातून मिळतात. भाताची पेज तर खूपच पौष्टिक आणि बलवर्धक मानली जाते. म्हणूनच कुपोषण कमी करण्यासाठी तांदूळयुक्त आहार खूपच फायदेशीर असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने देखील मान्य केले आहे.

पूर्णान्न असलेल्या तांदळाबद्दलची ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी