हेरगिरीसाठी वापरण्यात येणार्या सर्वात जुन्या युक्तीला आजकाल ’हनी ट्रॅप’ असे नाव पडले आहे. असे म्हणतात की, अस्वलाला पकडण्यासाठी शिकारी मधाचा वापर करतात. मधाचा वास हुंगत हुंगत अस्वल येते आणि सापळ्यात अडकते. त्याला म्हणतात हनी ट्रॅप. शत्रू देशातील महत्त्वाच्या व्यक्तींना जसे की, राजकारणी, संशोधक, सैनिक यांच्यासाठी अशाप्रकारचे सापळे रचले जातात. सापळ्यांमध्ये आता या मधाची जागा स्त्रीने घेतली आहे येवढेच. अर्थात काही प्रसंगी पुरुषांचा वापर देखील हनी ट्रॅप म्हणून करण्यात आल्याची उदाहरणे आपल्याला आढळतात.
सुंदर आणि चतुर स्त्रीचा वापर करून अशा व्यक्तींना मोहात पाडणे, त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळवणे, प्रसंगी त्यांना ब्लॅकमेल करणे हे आता हेरगिरीतील एक महत्त्वाचे शस्त्र म्हणून समोर आले आहे.



