शेअरबाजारात पैसे कमवायचे आणि जमवायचे असतील तर काही नियम पाळायलाच हवेत.सध्याच्या समाज माध्यमाच्या काळात बातम्या काही क्षणात जगाच्या या टोकापासून त्या टोकाला पोहचत असतात.हे लक्षात घेऊन आजचा हा पहिला नियम वाचा,तो पाळा आणि नंतरच पैसे गुंतवायचा विचार करा.
नियम असा आहे की बाजारातल्या कहाण्यांवर फक्त १० मिनिटं विश्वास ठेवायचा आणि त्या विसरून जायच्या.आता या कहाण्या कशा असतात ते ही समजून घ्या.फेसबुक चाळता चाळता- किंवा व्हॉट्सॅपच्या फॉरवर्ड पोस्टमध्ये अचानक एक पोस्ट दिसते 'सहा महिन्यात या शेअरने केले या लोकांना करोडपती '- अशा कहाण्या प्रेरित करतात हे खरेच आहे पण ही या बातमीची एक बाजू झाली. याच बातमीची दुसरी बाजू अशी असते की 'त्याच शेअरने केले 'सहा महिन्यात * करोडपतींना केले लखपती'.लक्षात घ्या या बाजारात फक्त एकाचा पैसा दुसर्याकडे जात असतो. जेव्हा एका माणसाचा फायदा होतो तेव्हा अनेक लोक थोडेथोडे नुकसान सहन करत असतात.अगदी शास्त्रीय परिभाषेत सांगायचं झालं तर शेअरबाजार हा Zero-Sum Game आहे. Zero-Sum Game म्हणजे एकाचे नुकसान झाल्याशिवाय दुसर्याचा फायदा होणारच नाही.
थोडक्यात बाजाराचे मन ओळखून खेळी करणं आणि आपल्या मनाप्रमाणे फायदा घेऊन वेळीच बाहेर पडणं हे तंत्र आत्मसात केलेच पाहीजे.
मोर्चात कधी सामील व्हायचं आणि कधी कलटी मारून घरी जायचं हे काही जणांना नेमकं जमतं तेच तंत्र इथे वापरायचे असते. ते समजण्याआधी बाजाराच्या सामूहिक मानसिक आंदोलनाचा अभ्यास करावा लागतो. ते जमलं की एंट्री आणि एक्झिटची दरवाजे कोणते ते कळतं.


