राशी आणि एटीम-बँकांतल्या रांगा: जाणून घ्या तुमची रास कोणती?

लिस्टिकल
राशी आणि एटीम-बँकांतल्या रांगा: जाणून घ्या तुमची रास कोणती?

तुमची रास कोणतीही असो, या आठवड्यात सगळ्यांच्याच राशीला एक साडेसाती लागलेली आहे- नोटा बदलून घेण्याची. पाहूयात आता अशा वेळेला प्रत्येक स्वभाव राशीच्या व्यक्तीला हे काम म्हणजे मजा वाटते की सजा...

मेष :

मेष राशीचं वैशिष्ट्य म्हणजे व्यूहरचना करणे. पण  या सप्ताहात आपल्या चातुर्याचा आणि हुषारीचा काडीइतका उपयोग नाही हे वेळीच कळल्यामुळे व्यूहरचना लांबणीवर टाकतील, इतर विषयात मन गुंतवतील, आठवड्याच्या शेवटी हाताशी मुबलक रोकड असेल इतकी व्यवस्था नक्की करतील. या सप्ताहाचे गाणे "इस शहरमें हर शख्स परेशान सा क्यूं है?"

वृषभ:

अत्यंत 'डाउन टु अर्थ 'असा विचार करणारी राशी असल्याने खिशात पैसे नसले तर रांगेत  उभे राहतील. पण तशी गरज भासणार नाही  आणि  'डाउन टु अर्थ 'असल्याने गरजेपुरते (म्हणजे त्यात चैन पण आलीच , चैन ही त्यांची नैसर्गीक गरज असते ) पैसे नक्कीच त्यांच्या गाठीला १००%  असतीलच.. त्यात भर म्हणजे यांचे  "समान शिलेषु आणि व्यसनेषु" असे मित्र त्यांना चणचण भासू देणार नाहीत. एकूण हा आठवडा त्यांच्यासाठी फारसा काही वेगळा नसेल. 

मिथुन:

या राशीला हा स्प्ताह म्हणजे पर्वणी आहे. यांच्या खात्यात किमान लिमीटच्यावर जेमतेम एक हजार असतील. पण आयुष्यातल्या अडचणी एन्जॉय करण्याचा मूळ स्वभाव असल्यामुळे हौसेखातर बँकांच्या रांगेत (म्हणजे बर्‍याच बँकाच्या बर्‍याच रांगांमध्ये) उभे राहतील. नव्या ओळखी करून घेतील,जोक्स करतील, टाळ्या देतील-घेतील आणि काम संपेपर्यंत नवी ओळख संध्याकाळी 'बसू या ' इतकी दाट करून घरी येतील. त्यामुळे मिथुनेसाठी  हा सप्ताह म्हणजे "मज्जानी लाईफ " !!!
या सप्ताहाचे गाणे : बंबईसे आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो"

कर्क:

घरी पुरेसे पैसे असतील. रांगेत उभे राहण्याची गरज पण नसेल. पण चेहेरा मात्र पगारच्या दिवशीच पाकीट मारल्या गेल्यासारखा बापुडवाणा असेल. बरेचसे पैसे मुलांना वाटण्यात जातील आणि सप्ताहाच्या शेवटी यांना गरज भासेल तेव्हा मोदींचा फोटो बघितला तरी यांच्या डोळ्यात पाणी उभे राहील.  यांच्यासाठी या  आठवड्याचे गाणे म्हणजे बाळ कोल्हट्करांच्या नाट्कामधले कोणतेही रडके गाणे.  उदाहरणार्थ : निघाले आज तिकडच्या घरी"

सिंह:

आपला अधिकार आणि इगो या दोन्हीला कोणीही या सप्ताहात भीक घालणार नाही,  याचा अंदाज पहिल्याच दिवशी आल्यावर हे  त्यांचा नेहेमीचा पवित्रा बदलून " यशस्वी माघार " घेतील. वर आपण कसे हुश्शार आहेत हे सगळ्यांना सांगत बसतील. हे प्रवचन ऐकायला मिथुन राशीची माणसं आवर्जून हजर राहतील. कारण चहा नाष्टा किंवा आणखी काही पेय या सगळ्याचा खर्च सिंह राशीवाले करणार आहेत. या गडबडीत मरण आहे त्यांच्या स्टाफचे. कारण यांचे पैसे भरण्यासाठी-काढण्यासाठी - बदलण्यासाठी रांगेत त्यांना उभे रहावे लागणार आहे. 
या सप्ताहाचे गाणे : मी नव्या दमाचा शूर शिपाई आहे ,कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे...

कन्या:

वर-वर पाहता साधी दिसणारी कन्येची माणसं आतून थोडीशी स्वार्थी आणि बरीचशी लबाड असतात. त्यामुळे त्यांच्या वरचं बँकींग अरिष्ट ते दुसर्‍यावर सोपवून ते निश्चिंत असतात. काटकसरी स्वभाव असल्यानं रोख रकमेची गरज त्यांना भासणार नाही. सोडेक्सो कुपनची किमान चार बंडलं हाताशी ठेवूनच चिंता करणारी ही राशी या सप्ताहात "सेफ" आहे. यांचे गाणे  "हम को मन की शक्ती देना "  फक्त या गाण्याची दुसरी ओळ त्यांची आवडती असते, ती म्हणजे "दुसरो की जय से पहले खुदकी जय करें" 

तूळ:

बाहेर वातावरण कसेही असो , तोल ढळणार नाही तो एकाच राशीचा. ती राशी म्हणजे तूळ. हातात आहे ते जपून खर्च करणार, गरज पडल्यास रांगेत उभे राहणार, मोदी किंवा अच्च्छे दिन यांच्यावरचे लेटेस्ट जोक्स निर्विकारपणे वाचणार (आणि फॉरवर्ड करणार नाही असा यांचा स्वभाव). दुसर्‍या (इतर) राशीच्या लोकांनी या सप्ताहात त्यांच्या सहवासात राहावे आणि संयम शिकावा. तूळेचे गाणे नाही. त्यांचा आवडता श्लोक आहे " सुखदु:ख समे कृत्वा लाभा लाभौ, जया जयौ" 

वृश्चिक:

अगदी नॉर्मल दिवसात देखील या लोकांचे व्यवहार कळणार नाहीत इतके गुप्त (आणि यशस्वी ) असतात, तर अशा आणीबाणीच्या प्रसंगात तर विचारायलाच नको. एक गोष्ट नक्की की त्यांचा भार तुमच्यावर पडणारा नाही. तुमचा भार ते घेणार नाहीत हे वेगळे सांगायला हवे का ?  "कंपनी "मध्ये रेड पडण्यापूर्वीच सिंगापूरला बस्तान हलवणारा "मलीक " आठवतो का ? बस्स . इतके सांगणे पुरेसे असावे.                        
आणि हो,  वृश्चिकेची माणसं गात नाहीत. वाजवतात.

धनू:

मूर्खपणाचा सार्वजनीक अविष्कार बघायचा असेल तर या सप्ताहात धनू राशीच्या माणसाच्या घरी जा आणि आपापल्या घरी जेवून,मगच जा. असे सांगायचे कारण असे  की या आठवड्यात यांच्या अंगात सुपर बँकर किंवा सुपर इकॉनॉमीस्टचा संचार झालेला असेल. त्यांचे विवेचन ऐकता ऐकता तुमची अन्नावरची वासना कमी झालेली असेल. तशी ही ज्ञानी आणि विद्वान माणसं पण अत्यंत अव्यवहार्य तोडगे करणं आणि सुचवणं हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. बर्‍याच वेळा सार्वजनीक ठिकाणी (म्हणजे सध्याच्या काळात रांगेमध्ये) स्वतःचे  हसे करून घेणारी काहीजणं दिसली तर ती या राशीची असतील. आपण लॅटरल थिकींगचे चे बादशाह असल्याची खात्री असल्यामुळे हे कोणतेही गाणे म्हणू शकतात. अगदी बागेश्रीच्या सूरात ते तोडी पण गातील. रांगेत यांच्या शेजारी शक्यतो उभे राहू नका, इतकाच सल्ला पुरेसा आहे.

मकर:

नेहेमीप्रमाणे , "संकटात सापडलेली तरुणी " अशी ही रास. एक तर यांना बातम्या उशीरा समजतात (आणि कळतात.) या सप्ताहात घाईघाईने बँकेत गेल्यावर चुकीच्या रांगेत उभे राहतात. त्यांची चूक नंबर लागल्यावर त्यांना कळते आणि मग दुसर्‍या रांगेत उभे राहतात पण फॉर्म चुकीचा भरतात. योग्य रांग , योग्य फॉर्म असे जमेपर्यंत बॅक बंद होते. एकूण कायम राँग नंबरवर असणारी ही राशी आहे. शेवटी यांचे काम होते पण तोपर्यंत सगळ्यांचीच कामे झालेली असतात. या सप्ताहात हे इतके बधीर झाले असतील की गाणे यांना अशक्य आहे.

कुंभ:

या जगात असून नसलेली माणसे म्हणजे कुंभ राशीची. कोणत्याही गोंधळात नसलेली ही माणसे या गोंधळात पण भाग घेणार नाहीत. अत्यल्प गरजा असल्याने पैशाची चणचण त्यांना भासणार नाही आणि "आंधळ्याची गुरं देव राखतो " या उक्तीनुसार गरज पडल्यास बँकेतला माणूस यांच्या घरी पैसे आणून देण्याचा चमत्कार या सप्ताहात यांच्या कडे बघायला मिळेल. गाणे? यांच्यासाठी? ते काय असते? 

मीन:

गरीब बिच्चारी मीन रास. काय  करावं बरं? काय्क्रवंब्रं? असं सतत पुटपुटणारी आणि स्वतःमुळेच हतबल झालेली मीन राशीची माणसं या सप्ताहात पैसे घालवून बसणार आहेत. "बँकेत कशाला जाता ? मी आत्ता करून देतो तुमचे काळ्याचे पांढरे" असे सांगून एखादा लबाड माणूस त्यांचे डोळे पांढरे करताना तुम्हाला दिसणार आहे. आयुष्यात नेहेमी तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणारी ही राशी गाणे काय गाणार? "वद जाऊ कुणाला शरण गं?"