झारखंडच्या अमिलीया टोली या गावातल्या एका विहिरीत हत्ती पडला होता. त्याला वाचवण्यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न चालले होते. गावकऱ्यांनी वनविभागाला बोलावलं. वनविभागाने चक्क आर्किमिडीजचं तत्त्व वापरून हत्तीला बाहेर काढलं आहे. हे कसं शक्य झालं ? यासाठी आपल्याला आर्किमिडीजचं तत्त्व माहित असणं गरजेचं आहे.
झारखंडच्या पोलिसांनी आर्कीमिडीसचं तत्त्व वापरून हत्तीचा जीव कसा वाचवला?


आर्किमिडीजचं तत्त्व
एखादा पदार्थ द्रायूत (द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थात) बुडविला असता त्यावर खालून वर असे एक बल लागू होते. त्याला उत्प्रणोदन (upthrust) असे नाव आहे व त्याचे मूल्य पदार्थाने बाजूस सारलेल्या द्रायूच्या वजनाएवढे असते. बाजूस सारलेल्या द्रायूचे आयतन (घनफळ) पदार्थाच्या बुडालेल्या भागाच्या आयतनाएवढेच असते.
सोप्प्या भाषेत समजा एक माणूस पाण्याच्या टाकीत उतरला तर बाहेर पडणारे पाणी त्याच्या आकारामानाइतके असेल.

तर, आता वळूया आपल्या मूळ घटनेकडे. वनविभागाच्या टीमने आधी तर मोटरच्या सहाय्याने विहिरीत पाणी भरलं. हे करत असताना हत्तीला इजा पोहोचणार नाही याची काळजी घेण्यात आली. पाणी भरत असताना आर्किमिडीज आजोबांच्या तत्त्वाप्रमाणे द्रवात बुडवलेल्या पदार्थाला खालून वर असं बल मिळालं. म्हणजे पाणी भरल्याने हत्ती वर ढकलला गेला. तो थोडा वर आलेला असताना त्याच्यासाठी फळ्यांच्या सहाय्याने बाहेर निघण्याचा मार्ग करून देण्यात आला.

तर, शाळेत शिकलेल्या धड्यांचा असा उपयोग केला जातो.