भारतीय आर्थिक क्षेत्राच्या रक्त वाहिन्या म्हणजे आपल्या बँका. भारतातील सर्व बँका Banking Regulation Act, 1949 प्रमाणे चालतात. या कायद्याच्या अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी भारतीय रिझर्व बँकेकडे आहे. १९६५ पर्यंत सहकारी बँका या कायद्याखाली येत नव्हत्या. रिझर्व बँक आहे, बँकिंग कायदा आहे, जनतेमध्ये आर्थिक विषयाचे ज्ञान वाढते आहे, तरीही बँकाच्या बुडण्याचे प्रमाण वाढतच आहे. थोडक्यात रक्तवाहिन्यांमध्ये अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. अशावेळी आपल्या अर्थ व्यवस्थेला कधी हार्ट अटॅक येईल हे सांगता येत नाही.
आज आपण बघुयात बँका बुडतात तरी कशा ?
बुडणाऱ्या बँकांमध्ये सहकारी बँकांचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. सहकारी बँका राजकारणी लोकांच्या जिंकून आलेल्या पॅनल तर्फे चालवल्या जातात. अर्थातच हितसंबंधीत लोकांना अग्रक्रमाने कर्ज दिली जातात. कर्जवसुलीकडे सोयीस्कररीत्या कानाडोळा केला जातो.



