कोव्हिडने घरात कोंडलेल्या तुमच्या आजोबांच्या उदास मिटमिट डोळ्यांना लखलखीत उजळताना तुम्हाला बघायचं असेल तर आज त्यांना इतकंच सांगा "आबा, आज किशोरकुमारचा जन्मदिवस आहे!" दुसर्या क्षणी एक खोडकर हसू तुम्हाला त्यांच्या चेहेर्यावर झळकताना दिसेल!!
१९६९ च्या दरम्यान तरुण प्रेमात पडण्याच्या वयात असलेल्या त्या पिढीला आराधनाच्या 'मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू' - 'रुप तेरा मस्ताना ' या गाण्यांनी वेड लावलं होतं. रोमँटिक होण्याची ती पहिली लाट होती. त्यानंतर शर्मिलीचं 'खिलते है गुल यहां' आलं आणि त्यानंतर फक्त नॉन स्टॉप किशोरकुमारचा जमाना होता! ऑल इंडीया रेडिओ आणि विविध भारतीवर अहोरात्र फक्त किशोर कुमारच! १९७५ साली अचानक एक दिवस किशोरकुमारची गाणी ऐकू येईनाशी झाली. बाजारात त्यांच्या रेकॉर्डस् मिळेनाशा झाल्या, सिनेमांत किशोरकुमारच्या गाण्यावर बंदी आली. नक्की काय झालं होतं ते सामान्य जनतेला तेव्हा कळलंच नाही. नंतरच्या काळात कळलं ते असं की सरकारने किशोरकुमार यांच्यावर बंदी घातली होती. काय होता हा प्रकार ते आजच्या लेखात वाचूया!!





