खूप दिवसांपासून कार जर एकाच जागी उभी असेल, तर तिच्यावर धुळीचा जाड थर जमा होतो. मोठ्यांना तर आपल्या कारवर जमा झालेली ही धूळ अजिबात आवडत नाही, पण लहान मुलांसाठी हा एक मजेशीर खेळ असतो. धुळीने माखलेल्या कारच्या काचेवर हे लहानगे आपलं नाव लिहितात किंवा चित्र काढतात. किंवा टारगटपणे "आता तरी धूळ पुसा" असं लिहितात. मात्र लहानपणीच्या गमतीला एका माणसाने गांभीर्याने घेत चक्क कारवर जमा झालेल्या धुळीतून एक नवीन कला शोधून काढली आहे. ज्याचं नाव आहे ‘डर्टी कार आर्ट’. नावात जरी ‘डर्टी’ असलं तरी ही कला नितांतसुंदर आहे राव.
चला तर याबद्दल आणखी जाणून घेऊ....
सुरुवात कशी झाली ?
स्कॉट वेड असं या कलाकाराचं नाव. स्कॉट अमेरिकेच्या सेन्ट्रल टेक्ससमध्ये राहतो. स्कॉटने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की एकेकाळी तो जिथे राहायचा तिथे धुळीने भरलेले रस्ते होते. या रस्त्यांमुळे तिथल्या पार्क केलेल्या कार्सवर पांढऱ्या रंगाची धूळ साचलेली असायची. स्कॉट जेव्हा कामावरून घरी यायचा, तेव्हा तो आपल्या कारच्या काचेवर चित्र काढायचा. इथूनच त्याला ‘डर्टी कार आर्ट’ ची आयडिया सुचली.
स्कॉटच्या या अद्भुत कलेसाठी त्याला लिओनार्डो ‘द विन्ची ऑफ डर्ट’ म्हणून ओळखलं जातं. त्याने काढलेली चित्रे आणि त्यातील बारकावे वाखाणण्याजोगे असतात. यासाठी लागणारी मेहनतही तेवढीच असते. कधी हातांनी तर कधी ब्रशने त्याला सतत ६ तास यावर काम करावं लागतं.
कारवर एवढी धूळ जमा होते का ?
डर्टी कार आर्टसाठी महत्वाची असलेली धूळ कारवर जमा होण्यासाठी अनेक आठवडे जाऊ शकतात. म्हणून स्कॉटने एक नामी शक्कल लढवली आहे. त्याने तेल आणि मातीच्या मिश्रणातून हुबेहूब धुळीसारखा दिसणारा थर बनवण्याची टेक्निक तयार केली आहे. यातून कृत्रिम धूळ तयार होते.
स्कॉटची ही अनोखी कला आता जगभरात पसरली आहे. त्याच्या कामामुळे त्याला जगभरातून मागणी येत आहे.
आता त्याच्याबद्दल आणि त्याच्या कलेबद्दल एवढं वाचल्या नंतर त्याच्या कलेचा एक नमुना तर बघावाच लागेल राव. चला तर बघूयात ‘डर्टी कार आर्ट’ चे ११ अफलातून नमुने :











