मंडळी तुम्हाला तर माहित असेलच की गुगल आपली माहिती गोळा करत असतो. म्हणजे जेव्हा आपण गुगलवर काही सर्च करतो, तेव्हा ती माहित गुगल साठवून ठेवतं. या माहितीच्या आधारे आपल्याला कोणती जाहिरात दाखवायची ते ठरवलं जातं. महत्वाची गोष्ट म्हणजे ही माहिती गुगल विकूही शकतं. तेवढी त्याला मुभा आहे.
हे तर झालं गुगलबद्दल. पण तुम्हाला माहित आहे का आपला स्मार्टफोन सुद्धा आपल्यावर नजर ठेवून असतो ? कसा ? चला समजून घेऊ....

जेव्हा आपण मोबाईलमध्ये एखादा अॅप डाऊनलोड करतो, तेव्हा इंस्टॉल करताना App Permission म्हणून ‘मायक्रोफोन’ ची परमिशन मागितली जाते. या पॉपअपवर क्लिक केलं की त्या अॅपला आपला मायक्रोफोन वापरण्याची परवानगी मिळते. या फिचरचा मुख्य उपयोग आवाजाद्वारे काहीही सर्च करण्यासाठी असतो. पण या फिचरला आपल्यावर नजर ठेवण्यासाठीही वापरलं जाऊ शकतं.
या मायक्रोफोन फिचरचा उपयोग फेसबुकसुद्धा करून घेतं. समजा आपण आपला फोन बाजूला ठेवून आपल्या एका मित्राबरोबर गप्पा मारतोय. गप्पांच्या ओघात आपल्या तोंडून तिसऱ्या मित्राचं नाव निघालं जो फेसबुकवर आपला मित्र नाही, तर अशावेळेस या तिसऱ्या मित्राचं नाव फेसबुक लक्षात ठेवतं आणि काही दिवसातच ‘People You May Know’ च्या लिस्टमध्ये तुम्हाला तुमचा तिसरा मित्र दिसून येतो. फेसबुकच्या या चोरून ऐकण्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाज उठवला गेला होता.

फेसबुक आपलं बोलणं चोरून ऐकत आहे याचा एक प्रयोग Neville नावाच्या तरुणाने नोव्हेंबर २०१७ ला करून बघितला होता. त्याने आणि त्याच्या पत्नीने फोन बाजूला असताना आपल्या गप्पांमधून मांजर आणि मांजरीच्या खाण्याचा उल्लेख केला. याआधी त्यांनी मांजरीबद्दल कधीही बोललं नव्हतं किंवा गुगलवर सर्च देखील केलं नव्हतं. या नवीन गोष्टी चर्चेत आल्यानंतर आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच दिवशी फेसबुकवर मांजर आणि मांजराच्या खाण्याच्या पदार्थांच्या जाहिराती दिसू लागल्या. यातून काय निष्कर्ष निघतो ?
Fun experiment to test at home: what happens when you talk about cat food around your phone? https://t.co/QpVzGoTVCl
— Ancilla (@ncilla) November 2, 2017
फेसबुक किंवा अॅपशिवाय अॅपल फोन्समध्ये असलेलं Siri, मायक्रोसॉफ्टचं कोर्टाना किंवा हल्ली मोबाईल फोनमध्ये आलेले विविध गेम्स सुद्धा मायक्रोफोनद्वारे बोलणं रेकॉर्ड करण्याचं काम करतात असं म्हटलं जातं.
फक्त मोबाईल फोनच्या बाबतीतच असं होतं असं नाही. 'Samsung's SmartTV' मध्ये असलेल्या ‘व्हॉइस कमांड’ फिचरमुळे काही खाजगी संभाषण रेकॉर्ड केल्याची एक केस नुकतीच समोर आली होती. या टीव्हीचा मायक्रोफोन घरातील बोलणं ऐकून त्याची माहिती तयार करत होता. यावरून जॉर्ज ऑरवेलची १९८४ ही कादंबरी आठवली. या कादंबरीतील सरकार नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी त्यांच्या घरातील टीव्हीचा वापर करून घेत असतं.

मायक्रोफोन बरोबरच कॅमेरा, कॉन्टॅक्ट्स, लोकेशन, कॅलेंडर अशा फोनच्या महत्वाच्या गोष्टींची परमिशन मागितली जाते. आणि या गोष्टी परमिशनमध्ये नमूद केल्याप्रमाणे तुम्हाला न विचारता वापरण्याची कोणत्याही अॅपला स्वातंत्र्य दिलेलं आहे.
ज्या लोकांना असं काही होतं याची माहिती असते, ते कोणत्याही अॅपला कोणतीही गोष्ट वापरण्याची परवानगी देण्याआधी विचार करतात, आणि गरज असेल तरच परमिशन देतात. खुद्द फेसबुकचा निर्माता आपल्या लॅपटॉपच्या कॅमेरा आणि मायक्रोफोनला चिकटपट्ट्या लावून त्यांचं तोंड बंद ठेवतो.
मंडळी या संपूर्ण प्रकाराकडे बघितल्यावर अशी शंका येते की ही माहिती फक्त जाहिरातीसाठी गोळा केली जाते की या पाठी आणखी काही कारण आहे?
