२६/११चा मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला ही भारताच्या इतिहासातली एक काळी घटना. त्यादिवशी आपण अनेक मोहरे आणि नागरिकही गमावले. असिस्टंट सब-इन्स्पेक्टर तुकाराम ओंबाळे यांच्या समयसूचकतेमुळे आणि निर्भिडतेमुळे कसाब हाती लागला. पण हे सगळे होत असताना त्यांना वीरमरण आले.
या तुकाराम ओंबाळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संशोधकांनी त्यांना एक आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या नावावरुन कोळ्याच्या एका नव्या प्रजातीला "आयसियस तुकारामी" असं नाव देण्यात आलंय. संशोधकांकडून प्रकाशित झालेल्या एका रिसर्च पेपरमधून या नावाचा पहिल्यांदा उल्लेख केला गेला आहे.

