सध्या जसजशी आपली जगण्याची पद्धत बदलत आहे, तसतशा आपल्याला होणा-या व्याधीही आपलं रूप बदलंत आहेत. याचा प्रत्यय आपल्याला सध्या वाढीस लागलेल्या, ज्यांना लाईफस्टाईल डिसिजेस् असं म्हण्टलं जातं, त्यांच्या संबंधाने सहजी येतो आहे.
आपण दिवसभरात काळानुरूप व्यवहार करत असतो. सकाळी झोपेतून जागे झाल्यापासून पुन्हा रात्री झोपेपर्यंत केल्या गेलेल्या आचरणाला दिनचर्या असं म्हणतात. आपल्या दिनचर्येमध्येही आपण ऋतूनुसार बदल करतो ज्यामुळे उन्हाळ्यात उन्हाचा आणि हिवाळ्यात थंडीचा त्रास होऊ नये. याला ऋतुचर्या म्हणतात.
मग आज यात झालेला बदल पुढील प्रकारे सांगता येतो -
- तेलकट, अतिगोड, अतितिखट, अतिखारट, मेद वाढवणा-या फास्टफूडसारख्या पदार्थांचं सेवन
- शीत पदार्थांचा आणि वातावरणाचा अतिरेक
- अति किंवा अयोग्य मद्यसेवन
- बैठं काम
- वेळी-अवेळी जेवण
- वेळी-अवेळी झोप
- व्यायामाचा अभाव
- मल-मूत्रादिकांच्या वेगांचे धारण
- अतिरिक्त ताण-तणावयुक्त जीवन
आपल्या शास्त्रांमध्ये सुयोग्य जीवनशैलीची साद्यंत माहिती देण्यात आली अाहे. असं असूनही आजच्या काळाला अनुसरून तिवं पुनरुज्जीवन करणं आवश्यक झालं आहे; अन्यथा आपल्या भोवतीचा लाईफस्टाईल डिसिजेस् चा पाश अधिकाधिक आवळत जाईल हे निश्चित.
