हा पक्षीमित्र रोज ४००० पोपटांना जेऊ घालतो

लिस्टिकल
हा पक्षीमित्र रोज ४००० पोपटांना जेऊ घालतो

साधारणत: २००४च्या त्सुनामीनंतर कधीतरी चेन्नईत राहणार्‍या शेखरला त्याच्या घरामागे दोन पोपट दिसले. त्याने त्या पोपटांना खाऊ घातलं. आपल्याला माहित आहेच, एकदा का एके ठिकाणी खायला मिळतं हे कळालं की तिथे प्राणी गर्दी करतात. इथंही तेच झालंय.  होताहोता पोपटांचे थवेच्या थवे या शेखरच्या घरी येत आहेत आणि तोही न थकता या सार्‍यांची भूक भागवतोय.

चला, आज जाणून घेऊया या शेखर आणि त्याच्या हिरव्या मित्रांबद्दल..

शेखरचा कॅमेरा दुरूस्त करण्याचा छोटासा व्यवसाय आहे. या कामातून मिळणार्‍या पैशांतले ४०% रूपये त्याचे या पक्ष्यांसाठी तांदूळ विकत आणण्यातच खर्च होतात.

शेखर भल्या पहाटे ४:३०ला उठतो. आपण पक्ष्यांना नेहमी कच्चं धान्य देतो. हा मात्र  तांदूळ थोडाफार शिजवतो आणि मगच पक्ष्यांना खायला देतो. सकाळी आणि संध्याकाळी असं दोन वेळचं या पोपटांचं खाणं चुकत नाही. 

आपले कबुतरखाने पाहिलेच असतील. फेकलेलं धान्य कसंही जनिमीवर पसरलेलं असतं. चालताना पायांखाली येतंच आणि असंही नाही के टाकलेलं सगळंच अन्न पक्षी खातात. थोडक्यात,  आपण नेहमी पाहतो त्या पद्धतीत धान्य खूप वाया जातं. या शेखरनं त्यावर छान उपाय शोधून काढलाय. त्यानं चक्क यासाठी खास लाकडी पट्ट्या तयार करून घेतल्या आहेत आणि सकाळी-संध्याकाळी दोन्ही वेळेस हे पोपट त्याच्या घरी पोचण्याआधी तो तांदूळ या पट्ट्यांवर छान मांडून ठेवतो. असं केलं नाही तर कदाचित ४००० पोपटांना पोटभर खायला तर मिळणारच नाही, आणि तांदूळ वाया जाईल तो वेगळाच. या पट्ट्या मांडायला त्याच्या घराची गच्ची कशी छान उपयोगी पडलीय पाहा. 

पाहायला गेलं तर या शेखरचं स्वत:चं घरही नाहीय. तो स्वत: भाड्याच्या घरात राहातो. पोपटांच्या संगतीनं इतर पक्षीही त्याच्या घरी रोज हजेरी लावतात.

पण या पक्ष्यांना कुठे शी करावी हे कळत नाही. या ४००० पक्ष्यांच्या विष्ठेनं आणि कलकलाटानं शेखर आणि शेजार्‍यांना आरोग्याचे विकार होऊ शकतात हेही तितकंच खरं..