मंडळी, तुमच्या नजरेसमोर अशी काही कुटूंबं नक्कीच असतील जिथे पती पत्नी एकाच हुद्यावर, किंवा वडील आणि त्यांच्यापाठोपाठ त्यांचा मुलगा एकाच हुद्यावर आहेत. पण तुम्ही कुठं असं कुटुंब पाहिलंय का, की ज्याच्या तीन पिढ्यांमधील सर्व सदस्य एकाच हुद्यावर काम करतायत? नाही? मग भेटा या भसीन मंडळींना...
दिल्लीच्या या भसीन फॅमिलीतल्या प्रत्येक सदस्यानं जणू पायलट बनण्याचा दृढनिश्चयच केलाय. या कुटुंबाचा प्रवास सुरू होतो कप्तान जयदेव भसीन यांच्यापासून. १९५४ च्या काळात भारतात असणार्या काही मोजक्या पायलट्समध्ये जयदेव यांचा समावेश होतो. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव, कप्तान रोहित भसीन आणि त्यांची पत्नी निवेदिता जैन हे दोघेही वैमानिकच आहेत. विशेष म्हणजे १९८४ साली अवघ्या २० वर्षे वयात निवेदिता यांना इंडियन एअरलाईन्सकडून नियुक्तीपत्र मिळालं होत. वयाच्या २६व्या वर्षी एका अपत्याची आई असणार्या निवेदिता या जेट प्लेन चालवणार्या जगातील पहिल्या महिला वैमानिक बनल्या.
निवेदिता जैन यांनी जगातील सर्वात मोठं विमान एअरबस A300 या विमानाचं कमांडरपद भूषवलंय, तसंच त्यांनी पहिल्यावहिल्या अॉल वुमेन क्रू फ्लाईटवर को-पायलटची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळलीये.

साहजिकच रोहित आणि निवेदिता यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या मुलांनाही आकर्षित केलं. म्हणूनच आज या कुटुंबाची तिसरी पिढी, म्हणजेच रोहित आणि निवेदिता यांचा मुलगा रोहन आणि मुलगी निहारिका हे दोघेही वैमानिकच बनलेत!! रोहन हा एअर इंडिया मध्ये गेली १० वर्षे कमांडर म्हणून, तर त्याची बहिण निहारिकाही ४ वर्षांपासून इंडीगोमध्ये वैमानिक म्हणुन काम करतीये. नुकतंच निहारिकानेही आपल्या आईप्रमाणे एअरबस A320 वर कमांड केलंय तर रोहननेही बोईंग ७७७ चं यशस्वी उड्डाण मारून आपल्या कुटुंबाची गगनभरारी कायम राखली आहे.
