जुळी भावंडं म्हटलं की आपलं कुतूहल जरा उफाळून येत राव! दोघांच्या दिसण्यातही कमालीचं साम्य आणि सोबत सगळ्या सवयी, आवडी निवडीही सेम टू सेम!! आपल्या देशातल्या अशाच एका जुडवा जोडीने एक विचित्र पराक्रम करून जुळे असण्याचा डबल आनंद घेतलाय. या भावांनी जुळ्या मुलींशी लग्न केलंय. लग्नात या नवरीसोबत असणार्या फ्लॉवर गर्ल्ससुध्दा जुळ्या होत्या. हद्द म्हणून इथे लग्न लावणारे फादरही जुळेच होते!!

ही गोष्ट आहे चेन्नईच्या धीरज आणि दिलकर या जुळ्या भावांची. दोघे एकाच प्रकारचे कपडे घालतात, IT कंपनीत एकाच प्रकारचं काम करतात. आणि दोघांना लग्नही जुळ्या मुलींसोबतच करायचं होतं. ५ वर्षांच्या अथक शोधमोहीमेनंतर मॅट्रीमोनीयल वेबसाईटवर यांना रिमा आणि रीना या जुळ्या बहिनी मिळाल्या.
इकडे रिमा आणि रिना या दोघींचीही डिमांड सेम होती. दोघी एकाच शाळेत शिकलेल्या, एकच आवडीनिवडी, आणि दोघीही नर्सचं काम करणार्या. या दोघीही लग्नासाठी तीन वर्षांपासून जुळ्या मुलांच्या शोधात होत्या. एकमेकांना भेटल्यानंतर या जुळ्यांच्या जोड्यांना जणू "हम बने तुम बने एक दूजे के लिये" असा फील आला... आणि हे अनोखं लग्न संपन्न झालं.

यांचा हटवादीपणा इथेच संपत नाही मंडळी. यांना लग्न लावण्यासाठी पाद्रीही जुळेच हवे होते! तेही शेवटी सापडलेच. या पाद्रींची तारिख मिळवण्यासाठी त्यांना एक महिन्याची प्रतिक्षा करावी लागली. आणि शेवटी रेजी आणि रोजी या जुळ्या पाद्रींनी चेन्नई पासून १०० कीलोमीटर्स दूर असणार्या केरळमधील त्रिचूर येथील चर्चमध्ये यांचं लग्न लावून टाकलं.
लग्न तर झालंय... पण आपला जोडीदार ओळखण्यात या जुळ्यांचा गोंधळ उडू नये म्हणजे मिळवलं!!
