समाजात ज्यांचे परिस्थितीमुळे पुरेसे शिक्षण होऊ शकले नाही असे अनेक जण आपल्याला दिसत असतात. शिक्षणाअभावी त्यांना चांगली नोकरी मिळू शकलेली नसते. यांच्यापैकी काही मिळेल ते काम करून गुजराण करत असतात, तर काही समोर असलेली परिस्थिती बदलण्यासाठी झटत असतात. यापैकी या संघर्षात काहीतरी वेगळे करणारे लोक यशस्वी झालेले बघायला मिळतात. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील ज्ञानेश्वर बोडखे यांची गणना या परिवर्तनशील लोकांमध्ये करता येईल. शेतीला आतबट्ट्याचा व्यवहार न समजता त्यांनी शेती समजून घेऊन शेतीत केलेल्या प्रयोगांमुळे त्यांचे नाव सर्वत्र कौतुकाने घेतले जात आहे.
ज्ञानेश्वर बोडखे यांना परिस्थितीमुळे अर्धवट शिक्षण सोडून पोटापाण्यापुरती नोकरी धरली. दहा वर्षं ही नोकरी केल्यावर त्यांना यापेक्षा वेगळे काहीतरी आपण करायला हवे असे वाटले. नोकरीत घरखर्च निघण्याव्यतिरिक्त दुसरे काहीही होत नव्हते. एकदा त्यांनी वर्तमानपत्रात एका शेतकऱ्याने लाखोंचे उत्पन्न कसे घेतले याबद्दल माहिती वाचली.
आपण देखील असे करून बघायला काय हरकत आहे असा विचार त्यांच्या मनात चमकला. त्यांनी नोकरी सोडून शेती करायचे ठरवले, पण त्यांचा हा निर्णय अनेक जवळच्या लोकांना आवडला नाही. शेतीत काहीही ठेवले नाही अशी त्यांची भावना होती. पण ज्ञानेश्वर आपल्या निर्णयावर ठाम होते, त्यांनी पॉलिहाऊसच्या माध्यमातून शेती करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी पॉलिहाऊसबद्दल एक कार्यशाळा जॉईन केली.
फक्त वर्कशॉप करुन ते थांबले नाहीत. अनुभवासाठी त्यांनी एका पॉलिहाऊसमध्ये काही दिवस नोकरी देखील केली. या कामासाठी ज्ञानेश्वरना येऊन-जाऊन ४० किलोमीटर सायकलचा प्रवास करावा लागत होता, पण मेहनतीचे चीज करायचे याचा पक्का निश्चय त्यांनी केला होता. पॉलीहाऊसबद्दल पूर्ण माहिती घेऊन त्यांनी स्वतःचे पॉलिहाऊस सुरू करण्यासाठी बँकेतून कर्ज घेतले.
कर्ज मिळवणे सोपे नव्हते. पण त्यांची इच्छाशक्ती दांडगी होती, शेवटी कर्ज मंजूर होऊन पॉलिहाऊस उभे राहिले. पण हे फक्त पहिले पाऊल पडले होते. खरा संघर्ष आता सुरू झाला होता. त्यांनी फुलांना बाजारात असलेली मागणी ओळखून आपल्या पॉलिहाऊसमध्ये गुलाब आणि इतर फुलांची लागवड केली. स्थानिक ठिकाणी असलेल्या बाजारात मग ते गुलाब विकू लागले.
हळूहळू मागणी वाढायला लागल्यावर ते इतर ठिकाणी असलेल्या बाजारांमध्ये फुले पाठवू लागले. हळूहळू त्यांना यश मिळत होते. वर्षभराच्या कालावधीत त्यांनी पॉलिहाऊससाठी घेतलेले १० लाखांचे कर्ज फेडून दाखवले. फुलांच्या शेतीतून त्यांची चांगली प्रगती होऊ लागली होती. पण अचानक आलेल्या मंदीने हा व्यवसाय तोट्याचा होऊ लागला. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी थेट गियर चेंज करत संयुक्त शेतीचा पर्याय स्वीकारला.
फुलांऐवजी ते आता फळे लाऊ लागले. सोबतीला भाजीपाला आणि दुधाचा व्यवसाय सुरू केला. आता त्यांच्या व्यवसायाची गाडी फुल स्पीडने धावायला लागली. ज्ञानेश्वर कमी शिकले असले तरी त्यांना तंत्रज्ञानाचे महत्व जाणवले होते. यातूनच त्यांनी मग एक डिलिव्हरी ऍप सुरू केले. लोकांनी या ऍपवर ऑर्डर नोंदवायची आणि त्याला घरपोच वस्तू पोहोचण्यात येईल अशा या संकल्पनेमुळे त्यांचा व्यवसाय अधिक वाढला.
तसेच त्यांनी ही प्रगती स्वतःपुरती मर्यादित न ठेवता इतर शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी गावातील शेतकऱ्यांना एकत्र करत त्यांच्यासाठी 'अभिनव फार्मिंग क्लब' सुरू केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना लाखोंचे उत्पन्न मिळत असते. स्वतः श्रीमंत होऊन थांबणे त्यांना आवडले नाही. अभिनव फार्मिंग क्लब इतरांना पण प्रगतिशील शेतीच्या वाटेने घेऊन जाणारा एक अभिनव उपक्रम ठरत आहे.
उदय पाटील
