जीवनात चढउतार सुरू असतात, पण काहींच्या आयुष्यातील उतार मात्र उतार नाही, तर घसरगुंडी वाटावेत इतके डेंजर असतात. राजाचे रंक होणे काय असते असा हा अनुभव असतो. अफगाणिस्तानवर तालिबानी राजवट आली आणि अनेकांना देश सोडून पळून जावे लागले. अफगाणिस्तानातील राष्ट्रपतीसहित अनेक मोठे नेते देश सोडून निघून गेले. याच देशाचा अर्थमंत्री देश सोडून गेल्यावर अमेरिकेत चक्क टॅक्सी चालवत आहे.
आता या परिस्थितीवर हसावे जी रडावे अशी परिस्थिती त्या बिचाऱ्या अर्थमंत्र्यावर आली आहे. मोहम्मद खालिद पायंदा असे या कधीकाळच्या अर्थमंत्र्याचे नाव आहे. आज मात्र भाऊ कुटुंबाचे पोट भरण्यासाठी उबर टॅक्सी चालवून दिवस काढत आहे. पायंदाला तालिबानी राजवट येईल याची कुणकुण लागता बरोबर त्याने अफगाणिस्तानातून काढता पाय घेतला होता.
पायंदा सध्या जॉर्जटाऊन विद्यापीठात शिकवत असतो. पण तिथे काम करून काही घर चालत नाही हे लक्षात आल्यावर त्याने उबर टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली आहे. एके ठिकाणी बोलताना ते म्हणाले की, "येत्या दोन दिवसात जर ५० ट्रिप केल्या तर आपल्याला बोनस म्हणून ९५ डॉलर मिळतील."
दोन दशकांच्या संघर्षानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेतले आणि तिथे तालिबानने कब्जा केला. तिथे असलेल्या सरकारमधील दिग्गजांनी एकेक करून तिथून काढता पाय घेतला होता. पायंदांची आई २०२० साली कोरोनात वारली आणि पायंदा अफगाणिस्तानचे अर्थमंत्री झाले होते.
एकेकाळी अफगाणिस्तानचा ६ अब्ज डॉलर्सचा अर्थसंकल्प मांडणारा माणूस आज टॅक्सी चालवत आहे. यापेक्षा नियतीचा क्रूर खेळ दुसरा काय असेल.
उदय पाटील
