त्यासाठी हे प्रकरण काय आहे हे समजून घ्यायला हवं.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ही अंतराळातली कायमस्वरूपी प्रयोगशाळा आहे. अमेरिका, रशिया, जपान, कॅनडा आणि इतर काही देश या प्रयोगशाळेचे सदस्य आहेत. मुळात हे नासाचं बाळ. त्यात आधी रशिया नव्हता. पण शीत युद्ध (कोल्ड वॉर) संपताना रशियाच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाला चांगलाच फटका बसला होता. त्यांना आर्थिक मदतीची गरज होती. दुसरीकडे रशियाचं या क्षेत्रावर प्रभुत्व होतं आणि अमेरिकेला त्याची मदत होण्याची आशा होती. त्यातून अमेरिकेने रशियाला स्पेस स्टेशनच्या भागीदारीची ऑफर दिली. रशिया यात आला तो असा. आज इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे १५ पेक्षा जास्त देश भागीदार आहेत आणि तेच ही प्रयोगशाळा चालवतात.
तर या रोगोझीनच्या म्हणण्याप्रमाणे रशिया हे स्पेस स्टेशन युरोप किंवा भारत किंवा चीन या देशांच्या भूमीवर पाडू शकतो. पृथ्वीपासून ४०० किलोमीटर अंतरावर अवकाशात असलेली सुमारे ४२० टन वजनाची ही प्रयोगशाळा ज्या कक्षेत आहे ती कक्षा रशियाच्या भूभागावरून फारशी जात नाही. त्यामुळे ती रशियाच्या भूमीवर पडण्याचा धोका कमी आहे.
ही प्रयोगशाळा फुटबॉलच्या मैदानाएवढी आहे. तिचा वेग आहे २८,००० किलोमीटर प्रति तास. म्हणजे पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला तिला फक्त दीड तास लागतो. दुसऱ्या शब्दात, एका दिवसात ती सोळा वेळा जग प्रदक्षिणा करते. कोणत्याही वेळी या प्रयोगशाळेत सदस्य देशांचे कमीत कमी सहा शास्त्रज्ञ उपस्थित असतात. सध्या असे सात जण आहेत. त्यापैकी चार जण युएसचे, दोघंजण रशियाचे, आणि एक जण जर्मनीचा आहे. मुख्यतः अवकाश संशोधन मोहिमांच्या अभ्यासासाठी, तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि शून्य गुरुत्व क्षेत्रातल्या प्रयोगांसाठी या प्रयोगशाळेचा वापर केला जातो.
१९९८ पासून ही प्रयोगशाळा कार्यरत आहे आणि कमीत कमी २०२८ पर्यंत तिचं काम चालू राहील अशी अपेक्षा आहे. पण रशिया आधीच तिथून गाशा गुंडाळण्याच्या बेतात आहे.
आता ही धमकी नक्की काय आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला इंटरनॅशनल स्पेस स्टेशन सुरळीतपणे सुरू ठेवण्यात रशियाची काय भूमिका आहे हे समजून घ्यावे लागेल.