भारताचा भूगोल आपण सगळ्यांनीच अभ्यासला आहे. पण म्हणून भारत आपल्याला खऱ्या अर्थाने कळला आहे का? साधं चार दिवस कुठे निवांत भटकायचं असेल तर आपल्या यादीत हमखास येणारी ठिकाणं म्हणजे गोवा, उटी, सिमला, नैनिताल, मुन्नार, मनाली, दार्जिलिंग, लेह लडाख, लक्षद्वीप, अंदमान नाहीतर राजस्थान. इतर ठिकाणं म्हणजे धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली तिरुपती, जगन्नाथपुरी, चारधाम, वाराणसी, सोमनाथ, गिरनार यांसारखी ठिकाणं. आता आम्ही तुम्हाला मौसेनराम, लोकटाक सरोवर, नामदाफा अभयारण्य, क्रेमपुरी केव्हज, डावकी नदी अशी काही ठिकाणं सांगितली, तर भेट दिलेली तर दूरच, पण ती कुठे आहेत हे नक्की सांगता येणारी पण फार कमी माणसं असतील. म्हणूनच भारत खरोखर कळला आहे का, हा प्रश्न विचारावासा वाटतो. फार सस्पेन्स न ठेवता आम्ही उत्तर सांगून टाकतो. ही सर्व ठिकाणं ईशान्य भारतात आहेत.
ईशान्य भारताबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे. अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल पी. बी. आचार्य यांचं एक वाक्य खूप बोलकं आहे: "भारतीयांना भारताचाच भाग असलेल्या ईशान्येकडल्या राज्यांची जेवढी माहिती आहे त्यापेक्षा जास्त माहिती त्यांना अमेरिकेची आहे." तर या लेखात ईशान्य भारताबद्दल काही रंजक गोष्टी माहिती करून घेऊयात.




