"तर विराटला टी -२० मधून बाहेर करा.." विराटला संघाबाहेर करण्याबाबत कपिल देव यांनी केलं मोठं वक्तव्य..

"तर विराटला टी -२० मधून बाहेर करा.." विराटला संघाबाहेर करण्याबाबत कपिल देव यांनी केलं मोठं वक्तव्य..

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याने आपल्या फलंदाजीने हे सिद्ध देखील करून दाखवलं आहे. मात्र २०१९ नंतर त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध शतक झळकावल्यानंतर त्याची कामगिरी खालावली आहे. दोन वर्ष होऊन गेले तरीदेखील त्याला एकही शतक झळकावता आले नाहीये. याच दोन वर्षांच्या कालावधीत त्याने आपलं कर्णधारपद गमावलं. आता त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी देखील संघर्ष करावा लागतोय. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याला धावा करता येत नाहीये त्यामुळे त्याला संघाबाहेर करण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान कपिल देव यांनी देखील विराटच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

भारतीय संघाला १९८३ विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव (Kapil dev) यांनी विराट कोहली बद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, विराट कोहलीला प्लेइंग ११ मधून बाहेर करून बेंचवर बसावं लागू शकतं. हे वक्तव्य करताना त्यांनी दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विनचं (R Ashwin) उदाहरण दिलं आहे.

कपिल देव यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, "हो, आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, विराट कोहलीला प्लेइंग ११ मधून बाहेर करून बेंचवर बसावं लागू शकतं. जर तुम्ही जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजाला कसोटी संघातून बाहेर करू शकता तर जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज देखील बाहेर बसू शकतो."

तसेच ते पुढे म्हणाले की, "मला तर हेच वाटतं की, विराट कोहलीने धावा केल्या पाहिजे. परंतु आता तो विराट खेळत नाहीये ज्याला आपण ओळखतो.जर विराट कोहली चांगली कामगिरी करत नसेल तर तुम्हाला त्या खेळाडूंना संघाबाहेर ठेवण्याचा देखील अधिक नाही जे चांगली कामगिरी करत आहेत." नुकताच इंग्लंडविरूद्ध झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात आर अश्विनला भारतीय संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे कपिल देव यांनी हे वक्तव्य केले आहे.

सध्या भारतीय संघातील युवा खेळाडू जोरदार कामगिरी करत आहेत. मध्यक्रमात फलंदाजी करण्यासाठी ईशान किशन, केएल राहुल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा आणि वेंकटेश अय्यर सारखे खेळाडू आहेत. त्यामुळे विराट कोहलीला संघाबाहेर केलं तरीदेखील हे खेळाडू त्याची जागा भरून काढू शकतात. याबाबत बोलताना कपिल देव म्हणाले की, "या खेळाडूंमध्ये स्पर्धा रंगली पाहिजे. कोहलीला देखील विचार करावा लागेल की, एकवेळ तो एक मोठा खेळाडू होता. आता त्याला पुन्हा एकदा नंबर १ खेळाडू व्हावं लागणार. इतके पर्याय उपलब्ध असताना फॉर्म पाहून प्लेइंग ११ ची निवड केली गेली पाहिजे.

काय वाटतं? विराट कोहलीला मध्यक्रमात संधी मिळाली पाहिजे का? कमेंट करून नक्की कळवा.