सेवानिवृत्त झाल्यावर नियमित उत्पन्न मिळवण्याचे सुरक्षित राजमार्ग!!

लिस्टिकल
सेवानिवृत्त झाल्यावर नियमित उत्पन्न मिळवण्याचे सुरक्षित राजमार्ग!!

सेवानिवृत्तीला काहीजण आयुष्याचा उत्तरार्ध गृहित धरतात, तर काही निवृत्त लोक सेवानिवृत्ती म्हणजे 'सेकंड इनींग'ची सुरुवात म्हणतात. या 'सेकंड इनिंग'वाल्यांची जीवनशैली पाहिली तर असा भास होतो की यांच्याकडे बक्कळ पैसा जमा असेल. पण बर्‍याच वेळा पैसा बक्कळ नसतो, तर जो हातात असतो त्याचे 'नो टेन्शन' व्यवस्थापन केलेले असते. साहजिकच ही मंडळी बिधास्त असतात. असे बिनधास्त जगण्याचे काही राजमार्ग 'बोभाटा' आज तुम्हांला समजावून सांगणार आहे. त्यांतल्या दोन योजनांबद्दल आजच्या या लेखात आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.

आता लक्षात घ्या, सेवानिवृत्तांचे दोन गट असतात. एक गट पेन्शनवाल्यांचा, तर दुसरा गट पेन्शन नसणार्‍यांचा! साहजिकच दोन्ही गटांची उद्दीष्टे वेगवेगळी असतात. त्यामागचा विचार मात्र एकच असायला हवा तो म्हणजे:

१ - हातात शिल्ल्क असलेली पुंजी १०० टक्के सुरक्षित असावी.
२ -महिन्याचा खर्च निघावा असा व्याजाच्या रुपाने परतावा मिळावा .
३ -गरज भासल्यास गुंतवलेली रक्कम सहज काढून घेता यावी
४ -आयकर शक्य तितका कमी भरावा लागावा.

हे कसं साध्य करता येईल? चला तर, आज बघू या दोन योजना!

योजना क्रमांक -१

योजना क्रमांक -१

केंद्र सरकारची वरिष्ठ नागरिक बचत योजना.

जवळच्या बॅकेत किंवा पोस्टात खाते उघडा. वर्षे ६० किंवा जास्त वय असलेले नागरिक किंवा ५५ ते ६० या वयोगटातील निवृत्त होणारे किंवा स्वेच्छा निवृती घेणारे नागरिक हे खाते उघडू शकतात.

गुंतवणूकीची मुदत ५ वर्षे अनिवार्य आहे. लॉक इन पिरीयड-५ वर्षे ही मुदत एकदाच तीन वर्षांनी वाढवण्याची सुविधा.

व्याज तिमाही दरसाल ७.४ % या दराने मिळेल. संपूर्ण मुदतीत व्याज दर एकसमान कायम असेल.

व्याजावर आयकर लागू आहे. टीडीएस पण कापला जाईल. सेक्शन 80C चा फायदा १.५ लाखापर्यंत मिळेल.

एका नावावर एका खात्यात जास्तीतजास्त १५ लाख रुपये आणि पत्नीचे वेगळे खाते उघडले तर आणखी १५ लाख जमा करता येतील. या खात्यात फक्त सेवानिवृत्तीचा फायदा म्हणून मिळालेली रक्कम निवृत्त झालयावर ३ महिन्याच्या आत जमा करावी लागते.

योजना क्रमांक -२

योजना क्रमांक -२

प्रधानमंत्री वय वंदना

केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ यांची पेन्शन योजना. ६० किंवा अधिक वयाच्या कोणत्याही नागरिकाला गुंतवणूक करता येते.

पेन्शन लगेच (इमीजीएट) सुरु होते. ते मासिक, तीन महिने, सहा महिने किंवा वार्षिक पध्दतीने घेता येते. व्याजाच्या हिशोबाने मासिक पेन्शनचा दर ७.४०% पडतो. वार्षिक पेन्शनला जास्तीतजास्त ७.७५% व्याज पडते.

या १० वर्षांच्या योजनेत व्याजदर एक समानच राहतो. गुंतवलेल्या रकमेवर पेन्शन अवलंबून असते. कमीतकमी मासिक १००० तर जास्तीत जास्त ९२५० मिळू शकते.

पेन्शनवर आयकर लागू आहे. टीडीएस नाही. इतर कोणतीही सूट लागू नाही. जास्तीतजास्त गुंतवणूक १५ लाख करता येते.

गंभीर दुखण्यांचा अपवाद वगळता गुंतवलेली रक्कम मुदतपूर्व सहज परत घेता येत नाही. पेन्शनधारकाच्या मृत्युनंतर गुंतवलेली रक्कम वारसाला मिळते.

पती आणि पत्नी दोघेही वेगवेगळी गुंतवणूक करू शकतात. (एकूण गुंतवणूक ३० लाख) ही पेन्शन योजना असल्याने बँकेच्या व्याजदरासोबत याची तुलना करणे अयोग्य आहे.

वाचकांना एक विनंती : या विषयावर शक्य तितके प्रश्न विचारा. 'बोभाटा' त्या प्रश्नांची उत्तरे तज्ञांची मदत घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवेल.

पुढच्या मंगळवारी आणखी तीन योजनांचा आढावा आपण घेऊया!