सिने जगतात काम करताना नाव, पैसा, प्रसिद्धी यांची कोणाला भुरळ पडणार नाही? सगळं जग आपल्याला बघतंय आणि आपण सर्वांच्या मध्यभागी आहोत, सर्वांच्या नजरा आपल्यावर रोखलेल्या आहेत, आपली वाह वाह होत आहे. चित्रपट, सिरीयल, मनोरंजनाच्या जगात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे डोळे या सर्व गोष्टींनी दिपून जातातच. पण काही असेही कलाकार असतात जे ग्लॅमरच्या जगाला निरोप देऊन शांत जीवन जगणं पसंत करतात. अशाच एकाची ही गोष्ट.
पूर्वी ८०-९० च्या दशकात श्रीकृष्णाची एक मालिका लागायची, त्यात श्रीकृष्णाची भूमिका करणारा कलाकर खरोखरच श्रीकृष्णाला साजेल असाच होता. लोकांना या पात्राने एवढी भुरळ घातली की श्रीकृष्ण जर या जगात अवतरले तर त्यांना जेवढा मन मिळेल तेवढाच या कलाकाराला मिळू लागला. हा कलाकार होता ‘सर्वदमन डी बॅनर्जी’.
‘श्रीकृष्ण’, ‘अर्जुन’, ‘जय गंगा मैया’, ‘ओम नम: शिवाय’ तसेच ‘स्वामी विवेकानंद', ‘स्वयं कृषि’, ‘आदि शंकराचार्य’ यासारखे धार्मिक कथानक असलेले सिनेमे देखील सर्वदमन यांनी केले. पण यात सर्वात जास्त गाजला तो त्यांचा श्रीकृष्ण. श्रीकृष्णाची एवढी लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी काही सिनेमे केले आणि हा कलाकार सिनेजगतातून अदृश्य झाला.
स्रोत
आता सर्वदमन यांनी बॉलीवूड आणि ‘डेली सोप’ला मागे सोडलं आहे आणि ते उत्तराखंड मधल्या ऋषिकेश इथं लोकांना मेडीटेशन शिकवण्याचं काम करतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘आयुष्यात एकवेळ अशी असते की जेव्हा तुम्हाला मनोरंजनाच्या जगतात पैसा आणि नाव हवं असतं. पण याही पलीकडे एक असं जग आहे, जिथे शांतता आहे आणि धावपळ नाही.’ एकंदरीत सन्यस्त जीवनाकडे त्यांचा ओढ अधिक आहे.
प्रसिद्धीपासून दूर जात अज्ञात घेणारे मनोरंजन विश्वात तसे कमीच, आपल्या सर्वांच्या लक्षात असलेले श्रीकृष्ण देखील त्यापैकीच एक.

