अवकाशातून तब्बल ३ टन वजनाच्या बॅटरीज पृथ्वीवर आदळणार आहेत...काय आहे हे प्रकरण ?

लिस्टिकल
अवकाशातून तब्बल ३ टन वजनाच्या बॅटरीज पृथ्वीवर आदळणार आहेत...काय आहे हे प्रकरण ?

आजवर तुम्ही धुमकेतू किंवा उल्का पृथ्वीवर आदळण्याच्या बातम्या वाचल्या असतील, पण आज आम्ही तुम्हाला चक्क बॅटरीज पृथ्वीवर आदळण्याची गोष्ट सांगणार आहोत. त्याचं असं आहे, की, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) सोडलेल्या काही जुन्या बॅटरीज सुमारे ४३६ किलोमीटरचं अंतर पार करून पृथ्वीवर आदळणार आहेत. या बॅटरीजचं वजन तब्बल ३ टन एवढं आहे. पण घाबरू नका ह्या एवढ्या वजनाच्या बॅटरीज पृथ्वीवर आदळणार म्हणजे लगेच कोणाला आपल्याला इजा होणार नाही. कारण, नासाच्या म्हणण्याप्रमाणे या बॅटरीज पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पोहोचण्यासाठी दोन ते चार वर्षे लागतील आणि जेव्हा या बॅटरी हळूहळू पृथ्वीच्या कक्षेवर येतील तेव्हा त्या तिथेच अंतराळात नष्ट होतील.

चला तर आता आपण सविस्तरपणे संपूर्ण  प्रकरण समजून घेऊ या.

नासाच्या एका मोहिमेत या जुन्या बॅटरीजचा वापर करण्यात आला होता. त्यांच्या जागी आता नवीन बॅटरी बसविण्यात आल्या असल्याने त्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून फेकण्यात आल्या आहेत. या बॅटरीजचं अचूक वजन २.९ टन एवढं आहे. या बॅटरीज अंतराळ स्थानकावर उर्जेसाठी वापरल्या गेल्या होत्या.

बॅटरीज पृथ्वीवर सोडण्यासाठी त्यांना एका रोबोटिक आर्मशी जोडून एका ठराविक अंतरावरून पृथ्वीवर सोडण्यात येईल. बॅटरी बदलण्याची प्रक्रिया सन २०१६ मध्ये सुरू झाली होती आणि तेव्हा ४८ निकेल हायड्रोजन बॅटरीजच्या जागी २४ लिथियम-आयन बॅटरीज बदलण्यात आल्या होत्या. जवळपास ४ वर्षानंतर म्हणजे २०२० मध्ये बॅटरीज पूर्णपणे बदलण्यात आल्या आहेत. या आधीच्या योजनेप्रमाणे जपानच्या H -2 ट्रान्सफर वाहनाच्या मदतीने त्यांना पृथ्वीवर आणले जाणार होते, परंतु २०१८मध्ये सोयुझ रॉकेट प्रक्षेपित न झाल्याने संपूर्ण योजना बदलली गेली आहे.

नासाच्या एका निवेदनात म्हटले आहे की, आतापर्यंत आयएसएसकडून पाठविलेली ही सर्वात मोठी अवकाश वस्तू असणार आहे. यापूर्वी, २००७ मध्ये आयएसएसवरून अमोनिया सर्व्हिसिंग सिस्टम टँक पाठविला गेला होता. 

तर, अवकाशातून पृथ्वीवर चक्क बॅटरीज सोडण्याचा हा पहिलच प्रयत्न असणार आहे. अशाप्रकारे आपण अंतराळातील कचरा नष्ट करण्याचा प्रयत्न तर करत आहोतच, पण सर्वच कचरा नष्ट होत नाही, काही कचरा अवकाशातच फिरत राहतो. फक्त चंद्रावरच किती कचरा साचून आहे ते या लेखात वाचा:

विष्ठा, उलट्या, रिकाम्या बॅगा, झेंडे.... अजून काय काय कचरा सोडून आलाय मानव चंद्रावर?

 

लेखिका: शीतल दरंदळे