आज कॉम्प्युटर आणि स्मार्टफोन यांनी आपलं आयुष्यच व्यापून टाकलंय. किती सहजपणे आपण त्याच्यावर कमांड्स देतो! अगदी सकाळचा अलार्म लावण्यापासून वेगवेगळ्या वेब सीरिज बघण्यापर्यंत आणि ऑनलाईन शॉपिंगपासून ऑफिसच्या कामकाजापर्यंत प्रत्येक गोष्टीत त्याने शिरकाव केलाय. पण ही सगळी कामं इतक्या सहज, झटपट आणि अचूकपणे करत असताना त्या यंत्राच्या आत कितीतरी गोष्टी घडत असतात. अमुक एक गोष्ट कर म्हटल्यावर ती कशी करायची याबद्दलच्या सूचना या यंत्रांना आधीच दिलेल्या असतात. या सूचना किंवा आज्ञावली म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्रॅम!! जगातला हा पहिला प्रोग्राम लिहिणारी व्यक्ती होती- ऑगस्टा ॲडा किंग!! लव्हलेस परगण्याची वतनदारीण!! या ॲडा लव्हलेसने सुमारे १८० वर्षांपूर्वी जगातला पहिला प्रोग्रॅम लिहिला आणि आज्ञावलीतल्या त्रुटीही शोधल्या. त्यामुळं तिला जगातली पहिली प्रोग्रॅमर आणि पहिली डिबगर (Debugger) म्हणूनही ओळखलं जातं.
ॲडा लव्हलेस ही अशी महिला होती, जी एका प्रख्यात, प्रतिभासंपन्न कवीच्या घरात जन्माला आली होती, पण लहानपणीच तिच्या वडिलांनी तिला नाकारलं, आईनेही वरवरचं (जगाला दाखवण्यासाठी) प्रेम केलं, आणि तिचं छोटंसं आयुष्य ही शोकांतिकाच ठरली. जिच्या स्मरणार्थ १९८०मध्ये एका संगणकीय भाषेला ॲडा हे नाव देण्यात आलं, त्या लेडी ऑगस्टा लव्हलेसबद्दल आजच्या बोभाटाच्या या लेखात जाणून घेऊयात.








