या शहरात मरणं हा कायद्यानं गुन्हा आहे..

या शहरात मरणं हा कायद्यानं गुन्हा आहे..

आता जन्म आणि मरण कुणाच्या हातात आहे का? तसा एकवेळ फॅमिली प्लानिंगने जन्म थांबवता येईल, पण गावातलं जिवंत माणूस कधी ना कधी मरणारच ना? मग त्या शहराचं सरकार त्या शहरात मरण आलं तर ते बेकायदेशीर कसं काय बरं ठरवू शकतं? 

हे शहर आहे नॉर्वेमधलं लॉंगइयरबेन (Longyearbyen) आणि ते आहे जगाच्या उत्तर टोकाचं शहर. तिथं इतकी थंडी आणि बर्फ असतो की विचारू नका. जमिनीचा १० ते ४० मीटरपर्यंतचा भाग म्हणजे बर्फच आहे. त्यामुळं इथं काही पीक उगवणंही शक्य नाही. लॉंगइयर नावाच्या अमेरिकन माणसानं त्याच्या उद्योगासाठी इथं वस्ती वसवली आणि आता त्याचं सुमारे ३००० लोकवस्तीचं शहर बनलंय. आता हे सर्वात उत्तरेकडचं शहर असल्यानं तिथं जगातल्या सर्वात उत्तरेकडची बॅंक, एटीएम, शाळा.. सगळं काही याच गावात आहे. इतकंच नाही, तर तिथं २५ ऑक्टोबर ते ८ मार्च सूर्यच उगवत नाही. म्हणजेच तिथली रात्र चार महिन्यांहूनही लांबलचक चालते. 

युरोपातलं शहर असल्यानं अर्थातच तिथं ख्रिश्चन वस्ती अधिक आहे. ख्रिश्चन धर्मात मृत्यूनंतर दफन होतं. तर या गावात सुमारे ७० वर्षांपूर्वी दफन केलेली प्रेतं अजून कुजलीच नाही आहेत. सतत बर्फ आणि थंडीमुळं प्रेतांचं विघटन होतच नाही. त्यामुळं नवीन प्रेतं पुरण्यासाठी लॉंगइयरबेनमध्ये माती असलेली जमीन तर नाहीच, पण आहे ती बर्फाळ जमीनही उपयोगाची नाहीय. म्हणूनच त्या शहरात मरण्याची कुणालाही कायद्यानं परवानगी नाहीय. आपला मृत्यू जवळ आला आहे असं कळालं की लोक दुसर्‍या गावाला निघून जातात. खरंतर तिथं माणसाचा राहण्याचा कालावधीच कमी आहे. 6-7 वर्षांहून अधिक काळ तिथं सहसा कुणी राहात नाही. आणि तरीही कुणी या गावात मृत पावलं तर सरकार त्या व्यक्तीला देशाच्या दुसऱ्या भागात नेऊन दफन केलं जातं. 

आपल्या जगात चित्रविचित्र गोष्टींची काही कमी नाही, नाही का?