वाचा ’साहित्य’ दिवाळी अंक- ’कादंबरी’ विशेषांक

वाचा ’साहित्य’ दिवाळी अंक- ’कादंबरी’ विशेषांक

दिवाळी म्हटलं की दिवाळी अंक यायलाच हवेत. फराळ करताना सोबत वेगवेगळ्या अंकांचं तोंडीलावणं असल्याशिवाय मराठी माणसाला दिवाळी साजरी झाल्यासारखी वाटतच नाही. साहित्यचा अंक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत  पोहचावा अशी साहित्य संघाची इच्छा होती. बोभाटाकडून त्यांना तांत्रिक मदतीची अपेक्षा होती. तेव्हा अशी अर्धवट मदत करण्यापेक्षा अंक विनामूल्य आमच्या संकेत संस्थळावर प्रकाशित करणे बहुजन हिताय आहे असे आम्हाला वाटले. हा उपक्रम कदाचित गेल्या वर्षीच चालू झाला असता परंतु वेळेअभावी ते शक्य झालं नाही.

प्रत्येक दिवाळी अंकाचा एक स्वभाव असतो आणि प्रत्येक वाचकाचीही विशिष्ट स्वभावाच्या दिवाळी अंकांना पसंती असते. हा अंक काहीसा वैचारिक असला तरी कंटाळवाणा आणि जड नाही. मराठी साहित्यात कादंबरीला एक उच्च स्थान आहे. आपल्या माहितीनुसार पहिली कादंबरी यमुना पर्यटन १८५७ ला लिहिली गेली. तेव्हापासून आजतागायत कादंबर्‍यांत, त्यांच्या वैविध्यात आणि लेखकांत भरच पडत गेली आहे. संपादक अशोक बेंडखळे यांच्या मते  "या दिवाळी अंकात एकूण कादंबरीचा झालेला विकास, त्यांतले बदल आणि आजची कादंबरी कुठल्या टप्प्यावर आहे  ते कादंबरीच्या जाणकारांना कळावे आणि त्यातून या वाङ्मय प्रकाराचा धांडोळा घ्यावा असा प्रयत्न केला आहे."

तर या अंकात प्रथमत: ’कादंबरी: एक साहित्यप्रकार’ या लेखात डॉ. मीनाक्षी दादरावाला यांनी कादंबरी या साहित्यप्रकाराचं सैद्धांतिक रूप मांडलं आहे. त्यानंतरच्या तीन लेखांत कादंबर्‍यांचा १८५७ ते १९६०, साठोत्तरी ते २००० आणि २००१ नंतरच्या कादंबर्‍या असा तीन कालखंडांत उहापोह केला आहे. १८५७ते १९६०च्या कादंबर्‍यांवर डॉ. महेंद्र कदम यांनी लिहिलं आहे तर पुढच्या दोन कालखंडांबाबत डॉ. वीणा सानेकर आणि डॉ. दत्ता पवार यांनी लिहिलंय. यापलिकडे जाऊन मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात असलेल्या रणांगण, बारोमास, अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट आणि कापूसकाळ या कादंबर्‍यांचं रसग्रहण आणि समीक्षा उत्तमरित्या करण्यात आली आहे.  शाम मनोहरांच्या आधुनिकोत्तर कादंबर्‍यांच्या फॉर्म आणि सतत बदलणार्‍या फॉरमॅटबद्दल गोपाळ चिकलपट्टींनी लिहिलं आहे तर डॉ. अरूणा दुभाषी यांनी नेमाडे प्रत्येक वाचकाला नक्की काय-काय नवीन देतात याबद्दल विस्तृतपणे लिहिलं आहे. 

हा मराठी साहित्यप्रकाराचा धांडोळा रसिक वाचकांना आवडेल असाच आहे. हा अंक इथून डाऊनलोड करून घेऊ शकता.