जमशेदपूरच्या या ११ वर्षाच्या मुलीने चक्क एक डझन आंबे एक लाख वीस हजाराला विकलेत...कारण काय?

जमशेदपूरच्या या ११ वर्षाच्या मुलीने चक्क एक डझन आंबे एक लाख वीस हजाराला विकलेत...कारण काय?

गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे सर्व स्तरातील लोकांना आर्थिक फटका बसला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि पोटावर हात असणाऱ्यांचे रोजगार गेले आहेत. अजूनही परिस्थिती सामान्य झाली नाही. आर्थिक गणित कोलमडल्यामुळं सर्वसामान्यांचे जगणंही कठीण झालं आहे. यात लहान मुलंही शिक्षणापासून लांब राहिली आहेत. कोरोनामुळे शाळा बंद पडल्यात. शहरात जरी ऑनलाईन शाळा होत असल्या तरी सर्व मुलं अजून ऑनलाईन शाळेत जाऊ शकत नाहीत. गरीब मुलांकडे स्मार्टफोन, इंटरनेट या सुविधाच नसल्याने ते शिकू शकत नाहीत. त्यांचे आईवडील ही ते विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे लहानग्यांना शिक्षणापासून मुकावं लागत आहे. पण यातच एक आशादायक बातमी समोर आली आणि एका मुलीचे रखडलेले शिक्षण सुरू झाले.

झारखंडमधील जमशेदपूर येथील तुलसी कुमारी नावाच्या मुलीची ही कहाणी आहे. तुलसी पाचव्या इयत्तेत शिकतेय. तिचे आईवडील मजुरी करतात. तिची घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. ती जिल्हापरिषदेच्या शाळेत शिकत आहे. ऑनलाईन शाळेमध्ये तिला क्लास अटेंड करणे शक्य नव्हते, कारण तिच्याकडे स्मार्टफोन नव्हता. पण तिने हार मानली नाही, तिने आंबे विकायला सुरुवात केली. यातून मिळालेल्या पैशातून ती स्मार्टफोन विकत घेणार होती.
आणि एक दिवस अमेय नावाचे ग्राहक आले आणि तिच्याकडून त्यांनी १२ आंबे चक्क १ लाख २० हजार रुपये देऊन खरेदी केले. अमेय यांनी १ साधा आंबा १०,००० रुपयांना खरेदी केला. तिला खूप आश्चर्य वाटलं.

नंतर तिला समजले. हे ग्राहक फक्त आंबे खरेदी करण्यासाठी आलेले नाहीत. अमेय हे व्हॅल्यूएबल एड्युटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. एका स्थानिक माध्यमातून अमेयला ११ वर्षीय तुलसी कुमारीच्या संघर्षाची बातमी समजली. तिच्यासाठी काही करता येईल या भावनेने अमेय आंबे खरेदी करण्यासाठी पोहोचले. त्यांनी १ लाख २०,००० तिच्या वडिलांच्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर केले. तुलसी कुमारीला अशी अनपेक्षित मदत मिळाल्याने खूप आनंद झाला. तिच्या आईवडिलांनी अमेय यांचे आभार मानले.

तुलसी कुमारी आता ऑनलाईन क्लासमध्ये शिकू शकते. तिचे थांबलेले शिक्षण सुरू झाले. अमेयसारखे दातृत्व अनेकजणांनी केले तर अनेक मुलांच्या बंद पडलेल्या शाळा पुन्हा सुरू होऊ शकतात. त्यांनी समाजापुढे खूप चांगला आदर्श घालून दिला आहे.

शीतल दरंदळे