जामताडा नावाचा झारखंडमध्ये एक जिल्हा आहे. या जिल्हयाची ओळख म्हणजे इथे साप मोठ्या प्रमाणावर सापडतात. या जिल्ह्याचे नाव देखील सापांवरूनच पडले आहे. संथाली भाषेत जाम म्हणजे साप आणि ताडा म्हणजे घर. सापांचे घर म्हणजेच जामताडा असे हे सगळे प्रकरण आहे. बॉक्साइटच्या खाणी ही देखील या जिल्ह्याची विशेषता आहे. पण गेल्या काही वर्षांत या जिल्ह्याची ओळख काही औरच तयार झाली आहे. या जिल्ह्यातून आलेल्या एका-एका कॉलने कित्येकांना कंगाल केले आहे.
काही वर्षांपूर्वी हा जिल्हा मागास म्हणून ओळखला जात होता. सायकलवर फिरणे हीच काय तिथली चैन. फारतर काय, काही लोकांकडे मोटरसायकल असायची. पण आता घरोघरी कार दिसतात. घरे पण एकापेक्षा एक भारी आहेत. तुम्ही म्हणाल लोकांनी चांगलीच मेहनत केलेली दिसते. तर तसे नाहीय. या गावातल्या कित्येकांना फक्त एका कॉलने मालामाल केले आहे.







