आपण सर्वांनी गरीबाघरची मुलगी श्रीमंत मुलाच्या घरी लग्न करून जाते आणि मग त्या मुलीने कसं चांगलं घर मिळवलं याची चर्चा होते अशा अनेक प्रेमविवाहाच्या कथा ऐकल्या असतील. आर्थिक स्तरामध्ये खूप मोठा फरक असलेले दोन प्रेमी जीव आणि त्यांचा विवाह यावर अनेक चित्रपटही बेतलेले असतात. पण आज आम्ही अशी कथा घेऊन आलो आहोत ज्यामध्ये एका राजकन्येने प्रेमासाठी चक्क आपले राजघराणे सोडले आहे. आणि ही काल्पनिक कथा नाही, तर जपानची राजकन्या माको हीची सत्यकथा आहे.
प्रेमासाठी लोक आपली संपत्ती-प्रसिद्धी, प्रतिष्ठा, घर-परिवार हे सर्व सोडून देतात. जपानच्या राजकुमारी माकोनेही असेच काही केले. माको ही जपानचे सम्राट अकिहितो यांची नात आहे. माकोने तिचा वर्गमित्र केई कोमुरोसोबत लग्न केले आहे. मंगळवारी सर्वसामान्य कुटुंबातील केईबरोबर लग्न करून तिने शाही दर्जाचा त्याग केला आणि घराण्याचे आडनावही सोडून दिले आहे.
जपानच्या शतकानुशतके जुन्या प्रथेनुसार, राजघराण्यातील सदस्य आणि सामान्य व्यक्ती यांच्यात विवाह तेव्हाच होऊ शकतो जेव्हा राजघराण्याचा सदस्य आपला सर्व शाही दर्जा, संपत्ती सोडून देतो.


