प्राचीन बर्फघरं ते आजचे इको फ्रेंडली फ्रीज : रेफ्रिजरेशनचा हा प्रवास वाचलाय?

लिस्टिकल
प्राचीन बर्फघरं ते आजचे इको फ्रेंडली फ्रीज : रेफ्रिजरेशनचा हा प्रवास वाचलाय?

फ्रीज नसेल तर काय होईल? हां, काही विशेष घडणार नाही... फक्त रोजचं घरातलं दूध कदाचित नासेल, अन्नपदार्थ खराब होतील, प्यायला थंड पाणी, थंड सरबते नसतील, हवं तेव्हा आईस्क्रीम खाता येणार नाही, कडधान्यांना बाहेर ठेवल्यानं कीड लागेल.. इतकंच काय ते होईल. विनोदाचा भाग सोडा, फ्रीजशिवाय सध्या राहाणं अशक्य आहे. अगदी वीजेवर चालणारा नसला तरी मातीपासून बनलेलं, वस्तू थंड ठेवणारं काही ना काही उपकरण आपल्याला लागतंच लागतं!

हे झालं आताचं, पण फार पूर्वीपासूनच मानव अन्न टिकवण्यासाठी ते थंडगार राखण्याचा प्रयत्न करत आलेला आहे. यात इराणी लोक आघाडीवर होते. इराणमध्ये यासाठी यखचल नावाची शीतगृहं असायची. ते लोक जमिनीखाली असलेल्या मोठ्या दालनांमध्ये बर्फ साठवत असत

इसवी सन पूर्व ५०० च्या सुमारास रेफ्रिजरेशन म्हणजे पदार्थ थंडगार करण्यासाठी बर्फघरांचा वापर केला जायचा. या बर्फघरांमध्ये वर्षभर बर्फ साठवता यायचा. हा बर्फ जवळपासच्या नद्या, तलाव यांच्यापासून मिळत असे. हिब्रू, ग्रीक, रोमन हे लोक बर्फ साठवण्यासाठी मोठे खड्डे खणायचे आणि त्यात साचलेला बर्फ वापरायचे. आजही बर्फघर किंवा आईस बॉक्सेससारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून पर्वतीय प्रदेशात काही ठिकाणी अन्न, मांस, दूध टिकवलं जातं.

कृत्रिमरित्या पदार्थ थंड करण्याचा म्हणजेच आर्टिफिशिअल रेफ्रिजरेशनचा शोध विल्यम कलन नावाच्या स्कॉटिश संशोधकाने लावला. द्रवपदार्थाला उष्णता दिल्याने तयार होणारी वाफ पदार्थ थंड करण्यासाठी वापरता येते हे त्याने दाखवून दिलं. पदार्थ थंड करण्यामागचं हे तत्त्व आजही रेफ्रिजरेटरमध्ये वापरलं जातं. त्यासाठी त्याने एका पंपाचा वापर करून डायएथिल इथर नावाचं रसायन असलेल्या कंटेनरवर अंशतः निर्वात पोकळी निर्माण केली. त्यानंतर त्याने इथरला उष्णता देऊन ते उकळू दिलं. या प्रक्रियेत आजूबाजूची हवा थंड झाली आणि अल्पप्रमाणात बर्फही तयार झाला. परंतु कलनची ही कल्पना कल्पनाच राहिली, तिला व्यवहारात आणलं गेलं नाही. काही काळानंतर सन १८०० च्या सुमारास अनेक अमेरिकन लोक शहरांकडे स्थलांतर करायला लागले. त्यामुळे अन्नधान्यांचे नैसर्गिक स्रोत म्हणजेच शेतं आणि ग्राहक यांच्यातलं अंतर वाढलं. परिणामी अन्न टिकवण्यासाठी रेफ्रिजरेशनची गरज भासायला लागली.

१८०२ मध्ये याला गती मिळाली ती थॉमस मूर या संशोधकाने डेअरी उत्पादनांची वाहतूक करण्यासाठी आईस बॉक्स तयार केल्यावर. या बॉक्सला त्याने 'रेफ्रिजरेटरी' असं नाव दिलं होतं. सुरुवातीच्या काळातले आईस बॉक्सेस मुख्यतः सुतार लोक बनवायचे. यामध्ये लाकडी पेट्यांना आतल्या बाजूने टीन किंवा झिंक यांचा लेप देऊन त्यात बर्फाचे मोठे तुकडे साठवले जायचे. बर्फाच्या तुकड्यांमुळे अन्न थंड आणि ताजं राहायचं. पण या आईसबॉक्सेसमध्ये बर्फ वितळून तयार झालेलं पाणी रोजच्या रोज काढून टाकावं लागायचं.

फ्रिजच्या आत्तापर्यंतच्या प्रत्येक मॉडेलमध्ये काही ना काही उणिवा होत्या. अजूनही अन्न टिकवण्यासाठी उपयुक्त ठरेल असा परिपूर्ण फ्रीज अस्तित्वात आला नव्हता. फ्रिजच्या जन्माचा प्रवास अनेक खाचखळगे पार करत सुरूच होता. त्याला पहिलं मोठं यश मिळालं १८३४ मध्ये. अमेरिकन संशोधक जेकब परकिन्स याने इथरचा वापर करून जगातली पहिली व्हेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन प्रणाली विकसित केली. आधुनिक फ्रिजच्या निर्मितीसाठीची ती पहिली पायरी. अर्थात अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा होता.

त्यातच विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत अन्नविषबाधा होण्याचं वाढतं प्रमाण हा चिंतेचा विषय बनला होता. अन्नधान्याचा प्रवास शेतांपासून गोदामापर्यंत आणि गोदामांपासून ग्राहकापर्यंत असा असे. यादरम्यान मोठ्या प्रमाणावर अन्नाचं प्रदूषण होई. मातीच्या संपर्कात येऊन किंवा योग्य प्रकारे न साठवल्याने या अन्नात क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम नावाच्या जिवाणूंचा संसर्ग होऊन यातून गंभीर स्वरूपाची अन्नविषबाधा होत असे. शिवाय टायफॉईडसारखे विकार होत. त्या काळात अन्नाची खराबी टाळण्यासाठी बर्फाचा वापर होत असला तरी त्याचे काही तोटेही होते. महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर बर्फ लागायचा. त्यामुळे बर्फाचे स्रोत धोक्यात येऊ लागले होते. त्यातून बर्फाला पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली. १८७६ मध्ये जर्मन संशोधक कार्ल व्हॉन लिंडे याने वायूचं द्रवपदार्थात रूपांतर करण्याची पद्धत शोधून काढली. ही पद्धत आज रेफ्रिजरेशन तंत्रज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या संशोधनामुळे अमोनिया कॉम्प्रेस्ड स्वरूपात वापरून तयार केलेला पहिला विश्वसनीय आणि कार्यक्षम रेफ्रिजरेटर तयार करण्यात आला. त्यामुळे अनेक औद्योगिक प्रक्रियांमध्ये बर्फाला पर्याय निर्माण झाला

१९१३ मध्ये फ्रेड वुल्फ याने घरगुती वापरासाठी पहिला फ्रीज तयार केला. त्यावेळचा फ्रीज म्हणजे आईस बॉक्सवर ठेवलेलं एक युनिट होतं. पुढे इतर अनेकांना या मॉडेलमध्ये सुधारणा करायला वाव मिळाला. यातलाच एक म्हणजे अल्फ्रेड मलाऊज. त्याने घरगुती वापरासाठी पहिला कॉम्पॅक्ट रेफ्रिजरेटर तयार केला. अल्फ्रेडची कल्पना १९१८ मध्ये फ्रिजिडेअर या कंपनीने विकत घेतली आणि त्यांनी रेफ्रिजरेटर्सचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायला सुरुवात केली. फ्रिजिडेअरचा विल्यम ड्युरांट याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने फ्रिजच्या डिझाइनमध्ये काही बदल केले आणि मॉनिटरटॉप फ्रीजचा जन्म झाला. हे नाव युएसएस मॉनिटर या युद्धनौकेवरून घेतलेलं होतं. यात फ्रीजमधलं वातावरण थंड राखण्यासाठी सल्फर डाय ऑक्साईड सारख्या वायूंचा वापर केलेला होता. पण या वायूंची गळती झाली तर विषबाधा होण्याचा धोका असल्याचं लक्षात आलं. परत एकदा पर्याय शोधायला सुरुवात झाली. नंतर फ्रेऑन हा वायू तुलनेने कमी धोकादायक असल्याचं संशोधकांच्या लक्षात आलं आणि त्याचा वापर सुरू झाला. (पुढे फ्रेऑनमुळेही वातावरणातल्या ओझोन थराला धोका निर्माण झाल्याचं लक्षात आलं) इतके 'माईलस्टोन्स' पार करून तयार झालेला फ्रीज ही त्या काळी ( १९२० च्या सुमारास) केवळ श्रीमंत वर्गाची मक्तेदारी होती. तेव्हा फ्रिजची किंमत १ हजार डॉलर एवढी प्रचंड होती.

त्याचदरम्यान केल्विनेटरनेही फ्रिजचं उत्पादन सुरू केलं. या फ्रीजमध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी ऑटोमॅटिक म्हणजेच स्वयंचलित सुविधा होती. १९२३ पर्यंत विजेवर चालणाऱ्या रेफ्रिजरेटर्सच्या बाजारपेठेत त्यांचा ८० टक्के वाटा होता. १९२२ मध्ये ऍबसॉरप्शन रेफ्रिजरेटर येऊन गेले. त्यामध्ये कूलिंग सिस्टिमच्या कार्यासाठी लागणारी ऊर्जा पुरवण्यासाठी उष्णतेचा स्रोत वापरण्यात आला होता. या फ्रिजला टक्कर देण्यासाठी दस्तरखुद्द आईन्स्टाईन पुढे आला. त्याने आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने आईन्स्टाईन रेफ्रिजरेटर तयार केला. यामध्ये कोणतेही हलणारे भाग नव्हते आणि संपूर्ण युनिट एकच उष्णतेचा स्रोत वापरून समान दाबाखाली काम करत होतं.

दुसऱ्या महायुद्धानंतर खऱ्या अर्थाने फ्रिजच्या उत्पादनाला आणि विक्रीला गती मिळाली. १९४० च्या दशकात तळाशी फ्रीजर असलेल्या आणि हाताळायला जास्त सोप्या असलेल्या फ्रीजचा उदय झाला. त्यात अनेक बदल होत होत आजचं स्वरूप साकारलं.

त्यानंतरचा जमाना होता आधुनिक रेफ्रिजरेटर्सचा. वायफाय आणि कॅमेरा असलेला फ्रीज आत ठेवलेलं अन्न कधी खराब होईल हे सांगायला लागला आणि या क्षेत्राने एक क्रांतिकारी पाऊल टाकलं. यानंतर इको फ्रेंडली, एनर्जी सेव्हिंग रेफ्रिजरेटर्स आले, जे आजकाल वापरले जातात.

जुन्या काळातली बर्फघरं ते आजचे इको फ्रेंडली, एनर्जी सेव्हिंग रेफ्रिजरेटर्स हा प्रवास फार मोठा आहे. त्यात कित्येकजणांचे परिश्रम, बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती यांचा कस लागला आहे. पुढचं स्वप्न आहे ते शून्य उर्जेवर चालणाऱ्या बायो रेफ्रिजरेटरची निर्मिती करण्याचं. तो दिवस दूर नाही.

जाताजाता फ्रीजबद्दल हे ही वाचून घ्या.. घरगुती फ्रीजबद्दल या महत्वाच्या गोष्टी माहित आहे का? 

घरगुती फ्रीजबद्दल या महत्वाच्या गोष्टी माहित आहे का ?

स्मिता जोगळेकर