जावेद हबीब या माणसाने गेल्या काही वर्षात हेअर स्टायलीस्ट म्हणून नाव कमावलं आहे. त्यांचे या विषयावरचे अनेक अभ्यासक्रम आहेत जे पूर्ण करून अनेक पार्लरवाले ते प्रमाणपत्र पार्लरच्या भिंतीवर लावतात. थोडक्यात का,य तर हेअर स्टायलींगच्या क्षेत्रात त्याने मोठा मान मिळवला आहे. पण हे व्यावसायिक यश या महाशयांच्या डोक्यात गेलेलं दिसतं आहे. काहीतरी विनोद करता करता त्याने काल समस्त महिलावर्गाचा अपमान केला आहे. आता संघटीतरित्या महिला त्याचं योग्य उत्तर देतीलच, पण हा कालचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर पेटला आहे.
आणि तुम्हाला माहिती आहेच की सोशल मीडिया म्हणजे दुधारी तलवार आहे. चांगले काम करा, तुमचे खूप कौतुक होते. पण जर काही चूक केली तर अशी काही बदनामी होते की कोणीही सुटत नाही. अगदी सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. हबीबचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याचे कारणही खूप विचित्र आहे. काय आहे हे प्रकरण चला बघू.
व्हिडीओमध्ये जावेद हबीबचे एका महिलेचे केस कापताना दिसत आहे. पण हा व्हिडीओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे जावेद हबीबचे केस कापताना तिच्या केसात थुंकतो. हा व्हिडिओ मुजफ्फरनगरचा आहे. तिथे एक सेमिनारमध्ये हा प्रकार घडला. व्हिडिओमध्ये जावेद हबीब एका महिलेला केस कापण्यासाठी बोलावतो. केस कापताना तो म्हणतो, "माझे केस घाणेरडे आहेत, कारण मी शाम्पू लावला नाही. नीट ऐका… पाण्याची कमतरता असेल तर थुंका". यावेळी तिथे उपस्थित असलेल्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. मात्र ज्या महिलेचे केस कापले जात आहेत, ती संतापली. तिने आपला राग व्यक्त करत म्हणले, "माझे पार्लर आहे, जावेद हबीबचे नाव मोठे असल्याने मी सेमिनार केला. पण त्याने माझ्याबरोबर चुकीचे वर्तन केले".
