काही लोकांची स्वप्नं ही स्वप्नंच राहतात, तर काही लोकं मात्र आपली स्वप्नं जगण्यात यशस्वी होतात. स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यात यशस्वी होऊनही आपल्याच चुकीमुळे या स्वप्नांचा चुराडा होताना पाहणारा आणि सगळे काही संपल्यावर पुन्हा एकदा त्याहून उंच भरारी घेणाऱ्या एका उद्योजकाच्या यशाची आणि अपयशाची कथा तुम्ही वाचली आहे का? परीकथेतील आयुष्यालाही सत्यात उतरवणारा आणि नंतर परीकथेप्रमाणेच ज्याची सगळी स्वप्ने क्षणात उध्वस्त झाली असा हा उद्योजक कोण होता तुम्हाला माहिती आहे?
आपल्या कल्पनांना सत्यात उतरवून संपूर्ण जगाला अचंबित करणारा हा व्यावसायिक होता जॉन डी’लॉरेन! डी’लॉरेन मोटार कंपनीचा मालक आणि जीएम म्हणजेच जनरल मोटर्सचा एक मोठा अधिकारी. १९७३ साली त्याचं लग्न झालं. लॉरेन अतिशय महत्वाकांक्षी होता त्याला आपल्या स्वप्नातील कार प्रत्यक्षात आणायची होती आणि ती त्याने बाजारात आणली देखील. आजही स्पीड आणि स्टाईलसाठी कुणाचे नाव घेतले जात असेल तर ते म्हणजे डीएमसीचे!






