प्रसिद्धीपासून सहसा दूर असणारा राज कुंद्रा सध्या देशभर चर्चेत आहे. शिल्पा शेट्टी सारख्या सेलेब्रिटीचा नवरा असण्याबरोबर श्रीमंत उद्योगपती म्हणून त्याची ओळख आहे. पण सध्याच्या त्याच्या प्रकरणांमुळे त्याची संपूर्ण पत मातीमोल झाली आहे. या भावाचा प्रवास हा खरतर शून्यातून झाला होता. त्याच्या याच प्रवासाबद्दल आज जाणून घेणार आहोत.
राज कुंद्राचा शाल विकण्यापासून ते पॉर्न फिल्म्स प्रकरणी अटक होण्यापर्यंतचा प्रवास जाणून घ्या!!


राज कुंद्राचे वडील पंजाबी होते. ते लंडनला गेले आणि तिथे बस कंडक्टर म्हणून काम करू लागले. पुढे त्यांनी एक छोटासा व्यवसाय सुरू केला, तर राज कुंद्राची आई एका दुकानावर काम करत असे. राज तिथेच लहानाचा मोठा झाला. राज कुंद्राने वयाच्या १८ व्या वर्षी घर सोडले आणि तो थेट नेपाळला जाऊन पोहोचला. तिथे त्याने पष्मीना शाल विक्रीचा व्यवसाय सुरू केला. यात हळूहळू प्रगती करत त्याने ब्रिटनमधील महत्वाच्या फॅशन हाऊसेसना शाल पुरवण्यास सुरुवात केली.
याच पैशांचा वापर करून त्याने २००७ ला दुबईला जनरल ट्रेडिंग एलएलसी नावाची कंपनी सुरू केली. या माध्यमातून त्याने महाग धातू, बांधकाम, खाणी, ग्रीन एनर्जी अशा क्षेत्रांमध्ये शिरकाव केला. या माध्यमातून त्याने अजून बक्कळ पैसा कमावला. हे पैसे मग तो बॉलिवूड सिनेमांमध्ये गुंतवत असे.

राज कुंद्रा याच्या पहिल्या बायकोचे नाव कविता होते. त्यांना एक मुलगी सुद्धा आहे. पण नंतर तिच्याशी घटस्फोट घेत, त्याने शिल्पा शेट्टी सोबत २००९ साली लग्न केले. त्यांना २०१२ साली वियान नावाचा मुलगा झाला.
याच वियानच्या नावाने २०१४ साली राजने अजून एक कंपनी सुरू केली. ही कंपनी मनोरंजन, गेमिंग, तंत्रज्ञान, ऍनिमेशन अशा क्षेत्रांमध्ये होती. २०१७ साली त्याने जगातली पहिली स्पोर्ट्स पोकर लीग सुरू केली होती.

भारत सरकारने जेव्हा स्टार्टअप इंडिया योजना आणली तेव्हा, राज कुंद्राने भारतातले पहिले लाईव्ह स्ट्रीमिंग ऍप सुरू केले. या ऍपचे नाव जेएल असे होते. राज कुंद्राची राजस्थान रॉयल्स या आयपीएल संघात असलेली सहमालकी सर्वाना माहीत आहे.
पण हाच राज कुंद्रा २०१३ साली स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांच्या चौकशीच्या जाळ्यात सापडला होता. आता पुन्हा एकदा पॉर्न सिनेमे तयार करण्याच्या आरोपाखाली तो अडकला आहे. यातून तो कसा बाहेर पडतो, यावर आता त्याचे आणि शिल्पा शेट्टीचे देखील भविष्य अवलंबून आहे.