रेशमाचे धागे ते साडी -पाहा प्रवास

रेशमाचे धागे ते साडी -पाहा प्रवास

रेशमी कपडे आवडणार नाही अशी कुणी सहसा नसेल. शाळेत आपण ’रेशमाचे किडे गरम पाण्यात टाकून त्याच्या कोशापासून रेशीम मिळवलं जातं’ इतकंच शिकतो. पण खरोखरी रेशमाच्या लडी बनवण्यापासून एक संपूर्ण साडी बनवण्यापर्यंतचा प्रवास जाणून घ्यायचा असेल, तर हा व्हिडिओ नक्की पाहा.

कोशांपासून कामगार रेशमी लडी बनवतात. त्या लडी गरम पाण्यात बुडवून त्या गरम असतानाच काठीच्या साह्याने पिळल्या जातात. मग सूत रंगवलं जातं. त्यातही साडी आणि पदराला वेगवेगळा रंग द्यायचा असेल तर बांधणीसारख्या पद्धतीनं   वेगवेगळे रंग दिले जातात. साऊथ इंडियात अजूनही बर्‍याच ठिकाणी हातमागावर काम केलं जातं. रेशमाची शेती असणारा माणूस अर्थातच श्रीमंत असतो. तो रेशीम बरोब्बर वजन करून कामगाराला देतो आणि साडी परत आल्यावर तिचं वजन करून मधल्यामध्ये रेशीम गायब केलं का हे ही पाहातो. हे कामगार हातमागावरती धागे लावून साडी विणतात.  साडीवरच्या बुट्ट्या आणि कोयर्‍यांसारखं डिझाईन करायलाही अंगात कसब लागतं. साडी पूर्ण झाल्यावर तिची खास पद्धतीनं घडी करून त्यांना बांधून ठेवण्यात येतं. 

रेशमी साड्या बनवणं हा मोठा उद्योग आहे. त्यात साडीचे शेव बांधणारे, रेशमाच्या शेतावरचे कामगार, सूत कातणारे, रंगारी, विणकर अशा बर्‍याच लोकांचं पोट या उद्योगावर चालतं. यातही विणकर जितकं चांगलं काम करेल, तितकी साडी सुंदर बनते. दुर्दैवाने ज्या किंमतीला त्यांनी बनवलेल्या साड्या विकल्या जातात, त्याच्या तुलनेत त्यांना काहीच मोबदला मिळत नाही.  कित्येक विणकरांच्या घरी अस्सल गर्भरेशमी साडी असणं हे त्यांचं स्वप्नच राहून जातं.