जीवनाचे मुख्य सार काय आणि धार्मिक वचनांचा यासाठी किती उपयोग होतो या प्रश्नांनी तिला पछाडले होते. १८९५ साली लंडन येथे स्वामी विवेकानंद यांचे भाषण ऐकल्यापासून भारतीय तत्वज्ञान आणि या तत्वज्ञानाला पोसणारी भूमी या दोन्ही बद्दल तिला खास आकर्षण होते. पुढे हे आकर्षण इतके वाढत गेले की या तरुणीने आपली नोकरी, आपले कुटुंब, इतकेच काय आपली मातृभूमी सोडून भारतात यायचा निर्णय घेतला. ब्रिटिश अंमलाखालील भारत आणि भारतीयांची दयनीय अवस्था पाहून तिने कायमचेच स्वतःला भारतीयांच्या उद्धारासाठी वाहून घेतले. या तरुणीचे नाव होते मार्गारेट एलिझाबेथ नोबेल. आज आपण त्यांना सर्वजण भगिनी निवेदिता म्हणून ओळखतो. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि भारतीय स्त्रियांच्या उद्धारासाठी भगिनी निवेदितांनी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांची ओळख करून देण्यासाठी आणि भगिनी निवेदितांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा लेखनप्रपंच!
भगिनी निवेदिताचे नाव आणि कार्य भारतीय भूमीशी इतके एकरूप झाले आहे की, भगिनी निवेदिता या मूळच्या भारतीय नाहीत या सत्याची कधी जाणीवच होत नाही. भगिनी निवेदितांचा जन्म २८ ऑक्टोबर १८६७ साली आयर्लंडमधल्या टायरोन परगण्यात झाला. त्यांचे वडील सॅम्युएल रिचमंड हे पाद्री होते. मार्गारेटला त्यांच्या वडिलांकडूनच मानवसेवेचे धडे मिळाले. फक्त दहा वर्षांचे वय असतानाच त्यांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले आणि मार्गारेट अनाथ झाल्या. त्यांचे आजोबा हॅमिल्टन यांनी मार्गारेटच्या कुटुंबाचे पालनपोषण केले. वयाच्या १७ व्या वर्षापर्यंत मार्गारेट यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. आपली बहिण आणि आईची देखभाल करता यावी म्हणून त्यांनी शिक्षिकेची नोकरी पत्करली.




