यावर्षी लालबागच्या राजाचं भक्तमंडळ खूष आहे. कारण यावर्षी एक वेगळा प्रयोग करून लालबागच्या गणपतीचं यथासांग विसर्जन झालंय. नेहमी खोल समुद्रात जाता न आल्यानं लाटांनी मूर्ती बाहेर येणं वगैरे प्रकार व्हायचे. पण या वर्षी ट्रेलरवरून मूर्ती समुद्रात आतपर्यंत नेऊन तिचं आजवर व्हायचं त्याहून चांगल्या पद्धतीने विसर्जन करण्यात आलंय.
पण मूर्ती आडवी झाल्यावर तिच्यावर जवळजवळ उभं राहून मूर्तीच्या मानेला धरून बुडवायचा प्रयत्न करणं काही भक्तांना आवडलंही नाहीय. लालबागचा राजा दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतोच. कार्यकर्त्यांनी कितीही धक्काबुक्की केली, तरी तिथे दरवर्षी श्रद्धेने जाणारे भाविक तितकेच. यावर्षी मंडळाच्या गैरकारभारानं चालू झालेल्या चर्चा विसर्जनानं चांगल्या रितीनं संपताहेत हे ही नसे थोडके.
