यांत्रिकीकरणाचे जसे फायदे तसे तोटेही आहेत. अघळपघळ गावांच्या ठिकाणी आखीव-रेखीव सिमेंटची जंगलं आली. भारतातल्या हवामानासाठी काचेची तावदानं असलेल्या इमारती अनुकूल नसल्यातरी आजकाल मोठ्या शहरांत त्यांचा सुळसुळाट झालेला दिसतो. थोडक्यात, यांत्रिकीकरणामुळे आणि आधुनिकतेच्या काहीशा अट्टहासामुळे निसर्गापासून माणसाचं दुरावलेपण वाढू लागलं. ही बाब बर्याच लोकांना खटकली तरी मोठं पाऊल उचललं ते रॉबर्ट स्मिथसन या अमेरिकन कलाकाराने. त्यांनी निसर्गातल्याच वस्तू म्हणजे दगड, माती, ओंडके, झाडे, वेली, बांबू तर कधी कापड वापरून कलाकृती निर्माण करण्याची चळवळ चालू केली. या चळवळीला लॅंड आर्ट किंवा अर्थ आर्ट असं म्हटलं जातं. लॅंड आर्ट निसर्गात तशीच ठेवली जाते आणि कालांतराने ती कलाकृती ज्या साहित्यापासून बनवलेली असते, त्यानुसार तिचं विघटन होतं किंवा ती मोडून पडते.
साधारण कोणतीही कलाकृती त्या-त्या कलाकाराच्या नावाने ओळखली जाते आणि जतनही केली जाते. इथं ते होत नाही. इथं ती आर्ट मूर्तस्वरूपात जर राहात असेल, तर ती राहाते फक्त फोटोजच्या स्वरूपात. कलाकाराने निर्माण केलेल्या कलेपासून स्वत:ला इतकं अलिप्त करून घेणं हे ही या कलेचं वेगळेपण. या कलेच्या बाबतीत नेहमीच्या केलेतले ठोकताळे गैरलागू ठरतात.






