इमारतीच्या गच्चीवरून सुरु झालेला व्यवसाय आज ३५,००० महिलांना रोजगार देतोय...लिज्जत पापडची यशोगाथा !!

लिस्टिकल
इमारतीच्या गच्चीवरून सुरु झालेला व्यवसाय आज ३५,००० महिलांना रोजगार देतोय...लिज्जत पापडची यशोगाथा !!

१५ मार्च १९५९ ला दक्षिण मुंबईतील एका इमारतीच्या गच्चीवर ७ महिलांनी एकत्र येऊन एक असा व्यवसाय सुरू केला, ज्याबद्दल कुणीही विचार केला नसेल. पहिल्या दिवशी त्यांनी बनवलेल्या पापडने फक्त ५० पैसे कमवले. आज तोच व्यवसाय १६०० कोटी रुपयांची कमाई करतो. तर ७ महिलांची संख्या वाढून ३५ हजार झाली आहे. हा एक व्यवसाय न राहता एक चळवळ झाली आहे, असे म्हणता येईल. या व्यवसायाची गोष्ट अनुभवली तर व्यवसाय कसा मोठा करावा याबद्दल अनेक बारीक सारीक गोष्टी समजतील. आम्ही आज लिज्जत पापडबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. 

लिज्जत पापड हे नाव ऐकले नाही, असा एकही माणूस देशात सापडणार नाही. सुरुवातीपासून हा ब्रँड मार्केटिंग आणि जाहिरातींच्या बाबतीत हुशारीने पाऊले टाकत आला आहे. सुरुवातीला ७ महिलांनी एकत्र येत एक किलो पापड तयार करून विकले होते. त्यात त्यांना ५० पैसे नफा मिळाला. दुसऱ्या दिवशी हा नफा एक रुपयांचा झाला. त्यांनी सचोटीने प्रयत्न सुरू ठेवले. हळूहळू इतर स्त्रिया त्यांना येऊन मिळाल्या. इथे कोणी एक मालक नव्हते. तसेच लिज्जत नाव ठेवण्यामागे देखील कारण आहे. गुजरातीमध्ये लिज्जतचा अर्थ होतो टेस्टी!!

आधी हा व्यवसाय फक्त गुजराती महिला करत असत, पण पुढे सर्व भागातल्या महिला एकत्र आल्या. गृहिणी असलेल्या महिलांसाठी एखादी खाण्याची गोष्ट तयार करणे आवडीचे काम असते. लिज्जतच्या व्यवसायामुळे महिलांना समाजात सन्मान मिळायला सुरुवात झाली. लिज्जतमुळे या महिला आपल्या मुलांना शाळा, कॉलेजमध्ये पाठवू शकल्या. 

लिज्जतच्या कामाची एक वेगळी पद्धत आहे. लिज्जतच्या पापड सेंटरवर पीठ तयार केले जाते. महिला हे पीठ आपल्या घरी घेऊन जातात आणि दुसऱ्या दिवशी पापड लाटून परत आणून देतात. या पापडांना व्यवस्थित चेक करून त्या महिलांना जागीच पैसे दिले जातात. प्रत्येक महिला दरदिवशी ६५० रुपये कमावते. या पद्धतीने लिज्जतचे काम चालत असते. 

हेच कारण आहे ज्यामुळे २.५ कोटी किलो लिज्जतची टेस्ट सारखीच असते. एका इमारतीच्या छतावरून सुरू झालेला बिजनेस आज १७ राज्यांत पसरला आहे. त्यांच्या ८२ शाखा असून ८० कोटींचा माल निर्यात केला जाततो. लिज्जतच्या उत्पादनांमध्ये लिज्जत मसाला, लिज्जत मिर्ची, लिज्जत सोप आणि डिटर्जंट आहेत. लिज्जतच्या महिलांना लिज्जत सिस्टर म्हणून ओळखले जाते. 

एक विशेष बाब म्हणजे लिज्जतचा व्यवसाय एवढा मोठा होऊन देखील त्यांनी मशीनचा वापर केलेला नाही. आजही लिज्जत पापड हातांनीच  तयार केलेला असतो. कामाच्या ठिकाणी गप्पा मारण्यास बंदी असते. यामुळे होते काय की, महिलांमध्ये गॉसिप होत नाही, यामुळे भांडणे देखील होत नाहीत. या उद्योगाचा ज्यांनी पाया रचला त्या जसवंतीबेन पटेल यांनी विचार केला असता तर प्रचंड श्रीमंत झाल्या असत्या. पण त्याना महिलांना स्वतःच्या पायावर उभे करायचे होते.

लिज्जतची २१ सदस्यीस समिती आहे. या २१ सदस्यांची आठवड्याला आणि महिन्याला बैठक होत असते. विशेष गोष्ट म्हणजे कंपनीला जेव्हा मोठा फायदा होतो तेव्हा महिलांना अडचणीच्या काळात कामी येईल म्हणून सोन्याचा शिक्का दिला जातो.

एवढा आगळावेगळा व्यावसायिक प्रयोग देशात दुसरा झाला नसेल. लिज्जत महिला सशक्तीकरणाबरोबरच देशासाठी मोठे योगदान देत आहे, असेच म्हणावे लागेल.