या जगातल्या प्रत्येक गोष्टीमागं काहीतरी निमित्त किंवा कारण दडलेलं असतं भाऊ. काही कारणच नसतं तर त्या गोष्टीचं अस्तित्वच उरलं नसतं... असो, फिलॉसॉफी बाजूला ठेवूयात. आज आपण आपल्या ज्ञानात आणखी थोडी भर टाकूया. चला, जाणून घेऊया वकीलांचा युनिफॉर्म हा नेहमी काळा आणि डॉक्टरांचा पांढराच का असतो? काय आहे यामागचं कारण?
तुम्हाला माहितीच असेल की रंग हे नेहमीच आपल्या मनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करत असतात. त्यामुळं वकील आणि डॉक्टरांच्या या विशिष्ट वेशभूषेमागेही एकप्रकारचं मनोविज्ञान दडलेलं आहे.
इथं वकिलांच्या काळ्या कोटाचा संबंध ब्रिटिश राजवटीशी येतो. म्हणजेच इतर अनेक पध्दतींप्रमाणं ही पध्दतही आपण ब्रिटिशांकडून घेतलीय.
ब्रिटिश काळात जज आणि वकील हे काळा गाऊन घालायचे. विग वापरायचे. हेतू हा की त्यामुळं त्यांच्यात एकप्रकारची गंभीरता आणि रहस्यमय प्रवृत्तीची छाप दिसावी. काळा रंग त्यांचा उच्चभ्रू दर्जा दर्शवायचा. हाच काळा रंग निःपक्षपातीपणा आणि अधिकाराचं प्रतिकही समजला जातो. तो न्यायदानाच्या प्रक्रियेत बाह्य प्रभावांना प्रतिकार करण्याची प्रेरणा देतो. त्याचप्रमाणं पांढर्या आणि काळ्या रंगाचं मिश्रण हे औपचारिकतेचंही प्रतिक आहेत.

भारतात १९६१ च्या ऍडव्होकेट अॅक्टनुसार देशातल्या सर्व कोर्टातल्या वकीलांसाठी हा काळा ड्रेसकोड बंधनकारक आहे. महिला काळ्या कोटसोबत पांढरी साडी नेसू शकतात. त्याचबरोबर पांढरा कॉलर, पांढरा बँडही वकीलांचा वेशभूषेचा भाग आहेत. आठवतो 'कायद्याचं बोला' सिनेमातला अनासपुरेचा कोर्टातला पहिला सीन? जज जेव्हा त्याला बँड कुठाय म्हणून विचारतात तेव्हा तिथं जे काही घडतं ते अफलातून आहे,नाही का?

तर दुसरीकडं डॉक्टरांच्या पांढर्या ड्रेसकोडमागेही रंगाचीच जादू आहे बरं का.. पांढरा रंग हा स्वच्छता, पवित्रता, विश्वास आणि प्रामाणिकपणाचं प्रतिक आहे. म्हणूनच वैद्यकीय पेशासाठी हा रंग अत्यंत महत्वाचा ठरतो. हा रंग आपल्याला एकप्रकारची सकारात्मक उर्जा प्रदान करतो आणि त्यामुळं तणावापासुन मुक्ती मिळते. याच कारणामुळं डॉक्टर तसेच दवाखान्यातील अन्य कर्मचारीही पांढर्या रंगाचा ड्रेसकोड वापरतात. बहूतांश लॅबमधले कर्मचारी आणि वैज्ञानिकही याच रंगाचे कपडे वापरतात.
समजलं ना मंडळी ? मग करा शेअर आणि तुमच्या मित्रांनाही सांगा.....
