शेतीसाठी जंगले जाळताना यातील अनेक वनस्पती जाळल्यानंतरही सुगंध पसरवत राहतात याचा शोध लागला असला तरी त्या वनस्पतीपासून अत्तर कसे बनवायचे याचा शोध मात्र उशीरच लागला. अत्तर किंवा परफ्युमचा पहिला वापर कुठून सुरु झाला याबद्दल अनेक मतांतरे आहेत. तरीही काही अभ्यासक मात्र बॅबिलॉन संस्कृतीतील एका स्त्री रसायनशास्त्रज्ञाला याचे श्रेय देतात. मेसोपोटेमियातील त्या स्त्रीचे नाव होते ताप्पुती. ताप्पुतीने सर्वात आधी तेल आणि सुगंधी फुले यांच्या मिश्रणातून पहिले अत्तर बनवले, असे मानले जाते. तापुत्ती ही बॅबिलॉन संस्कृतीतील एक प्रभावी व्यक्ति होती. मेसोपोटेमिया संस्कृतीतील शिलालेख सापडले त्यावरही तापुत्तीच्या नावाचा उल्लेख आढळतो. ती मेसोपोटेमियाच्या राजघराण्यातील दासींची प्रमुख होती. फुलांमधून सुगंधी अर्क कसा काढून घ्यायचा याचे प्राथमिक तंत्र तिनेच शोधले. तिच्यानंतर अनेकानी या तंत्रात आपापल्या पद्धतीने भर घातली. म्हणूनच अत्तराची शोधकर्ती म्हणून हे श्रेय तिलाच दिले जाते.
भारतातही इ. स. पूर्व ३५०० ते १३०० पर्यंत म्हणजे सिंधू संस्कृतीच्या काळात अत्तर बनवले जात होते. यासाठी नैसर्गिक सुगंध देणाऱ्या वस्तू म्हणजे फुले, वनस्पती, कस्तुरी यांचा वापर केला जात असे. याचा उपयोग सौंदर्यवृद्धी आणि औषधी अशा दोन्ही प्रकारे केला जात असे. आयुर्वेदातील मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्या चरक संहिता आणि सुश्रुत संहिता या ग्रंथांतही अत्तर बनवण्याची प्रक्रिया उद्धृत केली आहे. याशिवाय बृहदसंहिता या ग्रंथातही सुगंधी द्रव्य बनवण्याचे काही संदर्भ मिळतात.
मध्ययुगीन काळात विशेषत: मुघल काळात तर भारतात अत्तराला चांगलाच भाव आला होता. सातव्या शतकात राजा हर्षवर्धनच्या काळात राजधानी कनौजमध्ये अत्तराची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जायची. हैदराबाद शहरात तर आजही अत्तर निर्मितीच्या खाणाखुणा आढळतात. निजामाच्या काळात हे शहर विविध प्रकारच्या अत्तरांसाठीच प्रसिद्ध होते.