आपल्याकडे स्वतःची एक कार असावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते. काही लोक जास्त श्रीमंत झाले की त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त कार दिसायला लागतात. पण आज आम्ही युकेत बिजनेसमॅन असलेल्या एका शीख बंधूबद्दल सांगणार आहोत, त्यांच्याकडे जितक्या रंगाच्या पगड्या आहेत, तितक्या रंगाच्या रोल्स रॉयस कार आहेत. ज्यादिवशी ज्या रंगाची पगडी घातली त्याच रंगाची रोल्स रॉयस घेऊन ते बाहेर पडतात.
तुम्ही आजवर काही सेलेब्रिटींचे मॅचिंग बूट, कपडे, पर्स असे शौक बघितले असतील, या पठ्ठ्यासमोर त्यांचे शौक म्हणजे अतिसामान्यच! रौबेन सिंग असे त्यांचे नाव आहे. कार आणि पगडीचा रंग असे मॅचिंग फोटो वायरल झाल्यावर जगभर त्याचे नाव पोहोचले आहे.
रौबेन सिंग यांची युकेत ऑलडेपीए नावाची कंपनी आहे. त्यांनी असे करण्यामागे पण कारण आहे. त्यांना युकेत पगडी घालण्यावरून एकाने हिणवले. भावाने तिथेच ठरवले, यांच्या नाकावर टिच्चून जितक्या रंगाच्या पगड्या तितक्या रंगाच्या रोल्स रॉयस विकत घेऊन दाखवीन आणि खरोखर तसे करून दाखवले.


