यामानी हे सौदी अरेबियाचे माजी तेलमंत्री. आखातातील सौदी अरेबियासारख्या तेलावर तरंगणार्या देशाचे तेलमंत्री व तेही पुरी २५ वर्षे पदभार सांभाळणारा हा तेलिया वाचकाला गुंग करून ठेवतो. सौदी अरेबियाच्या जन्मापासून सुरू होणारी ही कथा अरबांच्या मागासलेपणापासूनही सुरू होते. तेलामुळे अचानक होणार्या मिळकतीने वाळवंटातील टोळ्यांचे दिवस बदलतात. अर्थातच पश्चिमी जग ही ताकद ओळखून तिथे आपले बस्तान बसवते व अरबांच्या तोंडाला पाने पुसून केवळ काही पैसे व सुंदर बायकांच्या बदल्यात खोर्याने तेल ओढत असते. अश्यावेळी यामानींच्या रूपाने सौदी अरेबियाला तेलमंत्री मिळतो व एकूणच अरबस्तानाच्या नशीबाने राजे फैजल त्यावेळी सत्तेवर असतात.
पुढे ओपेक, ओपेकचे राजकारण, गडाफी, इराणी शहा वगैरे तेलिये, ओपेकच्या एकजुटीने पाश्चिमात्यांचे घटते वर्चस्व, त्याच दरम्यान उफाळू लागलेला इस्राइल वाद, इजिप्तच्या खेळ्या, अमेरिका, ब्रिटनच्या चाली, रशियाची प्रत्युत्तरे, फ्रेंच, जर्मन, नेदरलंड, अल्जेरिया, इराक, कुवेत, इराण, इस्राइल, येमेन, जॉर्डन, जपान अश्या बहुविध खेळाडूंनी व त्याच वेळी प्याद्यांनी, रचलेले व्यूह व ते राजे फैजल यांच्या मदतीने भेदणारे यामानी वाचाकाला पुस्तक संपेपर्यंत खिळवून ठेवतात.